कसे होऊ उतराई !

कसे होऊ उतराई !

ज्या घरात मुली असतात ते घर सुख, समृद्धी व भरभराटीच्या मार्गावर असते. घरात प्रेम, जिव्हाळा व माणुसकी जपण्याचे काम कन्या ही लीलया पार पाडते. असे म्हणतात ना, ‘‘सुख, समृद्धीची पेटी म्हणजे बेटी’’.
- डॉ. विशाल गायकवाड,
डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी

राजाराम मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, वीरासलिंगम पंटुल्लू, पंडिता रमाबाई, सैय्यद मुमताज अली, ईश्वरचंद्र विद्यासागर, महर्षी धोंडो केशव कर्वे अशा अनेक समाजसेवकांनी स्त्री उद्धारासाठी पाया रचला. पुढे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडून त्यावर कळस चढवला. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री प्रत्येक क्षेत्रात समर्थपणे उभी असलेली आपण पाहतो. सहनशीलतेचे जिवंत उदाहरण म्हणून प्रत्येक पुरुषाने स्त्रीकडे पहिले पाहिजे.
स्त्रीचे आयुष्य बऱ्याच सुखद व दुःखद घटनांनी भरलेले व अनिश्चित असते. पुढे जाऊन हीच स्त्री कोणाची तरी पत्नी होते. सासरी तिला क्वचितच आपल्या सर्व इच्छा, अपेक्षा पूर्ण करता येतात. त्यात सासरकडचे समजूतदार असतील तर ठिक; नाहीतर तिला फार लांबपर्यंत कठीणकाळ काढावा लागतो.
मातृत्व हे परमेश्वराने स्त्रीला दिलेले एक अतुलनीय वरदान आहे. एखादी स्त्री आई झाली तर तिची जबाबदारी निश्चितच वाढते. एक म्हणजे घरचे काम व बाळाचे संगोपन अशी दुहेरी जबाबदारी; नोकरदार स्त्रियांसाठी नोकरी, घरचे काम व बाळाचे संगोपन अशी तिहेरी जबाबदारी. आई झालेली स्त्री ही किमान पाच वर्षे तरी तिच्या बाळात अडकून पडते आणि म्हणूनच तिला स्वतःसाठीही वेळ काढता येत नाही.
पुरुषांबरोबरच स्त्रियांनी सुद्धा एका स्त्रीला निश्चितच समजून घेतले पाहिजे. स्त्रियांवरील अत्याचार, शोषण, छेडछाड अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या भयानक घटना घडत असतात. जिथे अशा घटना घडतात, तिथे सगळ्यांनी जाब विचारायलाच हवा. शाळा व महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या मुलींची होणारी छेडछाड आपण ताकदीने रोखायला हवी. आपल्या देशाला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे आणि म्हणून प्रत्येक पुरुषाने स्त्रियांना आदर व सन्मानपूर्वक वागणूक दिली तरच आपण स्वतःला शिवरायांचे मावळे किंवा शिवभक्त म्हणवू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com