पुरंदर विमानतळ, रिंगरोडची घोषणा

पुरंदर विमानतळ, रिंगरोडची घोषणा

पुणे, ता. ९ : पुणे शहरासह महानगराचा कायपालट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, एमएसआरडीसीचा रिंगरोड आणि पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी शीर्ष (हेड) सुरू ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पांची घोषणा करत भविष्यात मागणीनुसार आणि मिळेल तशी तरतूद करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या प्रकल्पांसाठीचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्तेवर आल्यानंतर पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ पुरंदर तालुक्यातच होणार असल्याची घोषणा केली होती. त्यास सात महिने उलटून गेले. या विमानतळासाठी भूसंपादनाची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून काढून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) देण्यात आली. भूसंपादनासाठीची आवश्‍यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. केवळ निधीची आवश्‍यकता आहे. यामुळे या अर्थसंकल्पात भूसंपादानासाठी निधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र केवळ घोषणाच करण्यात आली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या रिंगरोडलाही पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे अर्थसंकल्पातून सांगण्यात आले. त्यामुळे भविष्यात या प्रकल्पासाठी नेमका किती निधी मिळतो, यावर त्याच्या कामाची गती ठरणार आहे. ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड’ रेल्वे प्रकल्पाला गती देण्यात येईल, असे काही महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी तरतूद केली नसल्याचे अर्थसंकल्पातून दिसून आले. त्यामुळे येत्या काळात या प्रकल्पांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, जनरेट्यानुसार तरतूद ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com