आरोग्य सुविधांचा विस्तार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य सुविधांचा विस्तार
आरोग्य सुविधांचा विस्तार

आरोग्य सुविधांचा विस्तार

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : कोरोना उद्रेकात देशातील ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या पुण्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे निर्माण करण्यास गेल्या वर्षामध्ये प्रशासनाने भर दिला. नवीन रुग्णालयांच्या उभारणीबरोबरच महापालिकेच्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढविणे, तेथे ऑक्सिजन सुविधा निर्माण करणे आणि सामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात असाध्य आजारांवर उपचार देण्याची सुविधा विकसित करण्यास प्राधान्य दिले आहे.


१४ ‘ओजीपी प्लँट’ बसविले
कोरोना उद्रेकात पुणे महापालिकेच्या सुविधा तोकड्या पडल्याचे उघड झाले होते. त्यावेळी महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये फक्त एक किलो लिटर ऑक्सिजनचा प्लँट होता. त्यामुळे युद्ध पातळीवर प्रयत्न करून संसर्गजन्य रुग्णालय असलेल्या डॉ. नायडू रुग्णालयात सिलिंडरमधून रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात आला. हे चित्र आता बदलले आहे. तेथे एक हजार ८५० प्रति मिनीट लिटर क्षमता असलेले दोन ऑक्सिजन जनरेटर प्लँट (ओजीपी) उभारले आहेत. महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत १४ ‘ओजीपी प्लँट’ बसविले आहे. त्यातून १० हजार ८३३ लिटर प्रति मिनीट ऑक्सिजन रुग्णांना देण्याची व्यवस्था उभारली. तसेच, डॉ. नायडू, बाणेर, सिंहगड रस्ता या भागातील महापालिकेच्या रुग्णालयांमधील खाटांची क्षमताही वाढविली आहे.


रुग्णसेवेचा विस्तार
- येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात डायग्नॉस्टिक केंद्र सुरू केले. तेथे रक्त तपासण्यांसह सिटी स्कॅन आणि ‘एमआरआय’ उपलब्ध.
- संगमवाडी येथे आरोग्य तपासणीची सुविधा. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वर्षभरात डायलिसिस सेंटर सुरू केली.
- वारजे येथे महापालिकेच्या बराटे रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अतिदक्षता विभाग उभारण्यात प्रशासनाला यश आले. त्यात १२ खाटा आहेत. तसेच, ५० खाटांचे मल्टिस्पेशालिटी सेवा उपलब्ध. ‘सीजीएचएस’पेक्षा (सेंट्रल गर्व्हन्मेंट हेल्थ स्कीम) कमी दराने येथे रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळणार.
- बिबवेवाडी, वानवडी आणि बाणेरमध्ये वर्षभरात रुग्णालये मंजूर केली. खासगी सहभागातून रुग्णालये उभारण्याची प्रक्रिया सुरू.
- कोरोनापूर्वी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये १२०० खाटांची क्षमता होती. ती आता २००० झाली आहे. त्यापैकी या वर्षभरात ३०० खाटांची भर पडली.

सरकारी खासगी भागीदारीतून मोठ्या प्रमाणात शहरात आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचा निश्चित फायदा शहरातील गरीब रुग्णांना मिळेल. अद्ययावत वैद्यकीय सुविधा अत्यल्प दरात रुग्णांना उपलब्ध होतील.
- डॉ. संजीव वावरे,
सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका