पुण्यात आणखी पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात आणखी पावसाची शक्यता
पुण्यात आणखी पावसाची शक्यता

पुण्यात आणखी पावसाची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात जोरदार पावसाची नोंद होत आहे. दरम्यान पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
गुरुवारी (ता. १६) शहरात ३.६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. बुधवारी (ता. १५) सायंकाळनंतर शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडल्या होत्या. अवकाळी पावसामुळे नागरिकांची देखील गैरसोय झाली होती. त्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरणाची स्थिती होती व दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे कमाल तापमानात घट झाल्याने उन्हाच्या तापापासून काहीशी सुटका झाली. मात्र अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी देखील साचले होते. पुणे व परिसरावर सुमारे १० किलोमीटर उंचीचे ढग निर्माण झाले होते. तशी ३० ते ४० किमी इतक्या वेगाने वारे वाहत होते. दुपारी चारनंतर पेठांसह खडकवासला, शिवाजीनगर, शिवणे, उत्तमनगर, बाणेर, मुंढवा, केशवनगर, बालेवाडी आदी परिसरात पावसाला सुरवात झाली.

पश्‍चिम, मध्य आणि द्विकल्पीय भारतात मेघगर्जनेसह वादळी वारे आणि गारपिटांसह पावसाची स्थिती आहे. सध्या नैॡत्य राजस्थान आणि कच्छ परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यात दक्षिण तमिळनाडू ते उत्तर कोकणापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तर बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे हे पश्‍चिम, दक्षिण आणि मध्य भारतासह राजद्यात प्रवेश करत आहेत. या संपूर्ण घडामोडींमुळे पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे पुणे व परिसरात येत्या शनिवारपर्यंत (ता. १८) अशी स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाची स्थिती व ढगाळ हवामान निवळण्याची शक्यता आहे.
- अनुपम काश्‍यपी, हवामानशास्त्रज्ञ


पुण्यात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
शिवाजीनगर ः ३.६
पाषाण ः ३.६
लोहगाव ः ०.२
चिंचवड ः ७
लवळे ः ०.५
मगरपट्टा ः १