ऑनलाइन शिक्षणही मुख्य प्रवाहात

ऑनलाइन शिक्षणही मुख्य प्रवाहात

पुणे, ता. १९ ः आजवर नियमित शिक्षणापसून वेगळे मानले जाणारे दूरस्थ किंवा ऑनलाइन अभ्यासक्रम आता मुख्य प्रवाहात येणार आहेत. पदवीच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आता ४० टक्क्यांपर्यंतचे श्रेयांक या दोन पद्धतीने अभ्यासता येणार आहेत. ज्यामध्ये स्वयंम प्लॅटफॉर्मसह विविध कौशल्याधारीत शिक्षणसंस्थांच्या आभासी अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परिपत्रकानुसार राज्याच्या सुकाणू समितीनेही या बदलाची शिफारस केली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात ४० टक्के श्रेयांक हे कौशल्याधारीत किंवा आवडीच्या अभ्यासक्रमांतील असणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आभासी शिक्षणाचा पर्यायही खुला करून देण्यात आला आहे. ऐच्छिक श्रेयांकासाठी विद्यार्थी त्याच विद्यापीठातील दोन भिन्न महाविद्यालये किंवा इतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांनी उपलब्ध केलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमांचाही आधार घेऊ शकतात. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर सांगतात, ‘‘पूर्वी दूरस्थ अभ्यासक्रमांना वेगळे मानले जात होते. विनाकारण असलेली भिंत आता नव्या शैक्षणिक धोरणाने नष्ट केली आहे. कौशल्य विद्यापीठांसह विविध संशोधन संस्थांचेही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना घेता येतील.’’ विद्यार्थ्याला त्याचे ६० टक्के श्रेयांक प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थेत पूर्ण करावे लागतील, तर उर्वरित श्रेयांकासाठी तो इतर ठिकाणी प्रवेश घेता येईल.

ऑनलाइन श्रेयांकासाठी संस्था
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ
- राज्य कौशल्य विद्यापीठ
- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था
- गोखले राज्यशास्र व अर्थशास्त्र संस्था
- तंत्रशिक्षण संस्था
- शासकीय पॉलिटेक्निक

काय फायदे होणार?
- उच्चशिक्षणात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल
- नोकरीच्या दृष्टीने आवश्यक अभ्यासक्रम विद्यार्थ्याला पदवीकाळातच पूर्ण करता येतील
- आवडीच्या किंवा कौशल्याधारीत अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल
- दूरस्थ शिक्षण किंवा ऑनलाइन शिक्षणाला समाजात दुय्यम समजले जाणार नाही
- कमी शुल्कात मान्यताप्राप्त संस्थांमधून आवडीचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल
- जगातील नामवंत विद्यापीठांचे शिक्षण विद्यार्थ्यांना घरबसल्या घेता येईल

‘यूजीसी’नेच ४० टक्क्यांपर्यंत ऑनलाइन अभ्यासक्रमांना परवानगी दिली आहे. निश्चितच काही बाबतींत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रमांचा फायदा होईल. प्रत्यक्ष कौशल्याधारीत अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना कार्यानुभवावर भर द्यावा लागेल.
- डॉ. भूषण पटवर्धन, माजी उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

कौशल्याधारीत अभ्यासक्रम ही काळाची गरज आहे. म्हणूनच या धोरणात्क निर्णयाने राज्याचे कौशल्य विद्यापीठ म्हणून आम्हाला विशेष आनंद आहे. तंत्रज्ञानाबरोबरच कृषी, वाणिज्य आणि मानव्यविद्याशाखेतील विविध ऑनलाइन अभ्यासक्रमांवर आमच्या विद्यापीठाचा भर असेल.
- डॉ. अपूर्वा पालकर, कुलगुरू, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com