पाच रुपयांचा सोस पडला दीड हजाराला

पाच रुपयांचा सोस पडला दीड हजाराला

पुणे, ता. २० ः रखरखत्या उन्हात प्रवासी तहान भागविण्यासाठी पाणी विक्रेत्याकडे गेला. पाण्याची बॉटल मागितल्यावर पाच रुपयांचा नफा कमविण्याच्या उद्देशाने विक्रेत्याने १५ रुपयांची बॉटल २० रुपयांना विकली. प्रवाशाने जास्तीच्या पाच रुपयांची विचारणा केल्यावर विक्रेत्याने नेहमी प्रमाणे कुलिंग चार्जेस कारण पुढे केले. प्रवाशानेही बिलाची मागणी केली. मात्र, बिल न मिळाल्याने पठ्याने संबंधित विक्रेत्यांची एसटी प्रशासनाकडे तक्रार केली. यानंतर एसटी प्रशासनाने त्या विक्रेत्याला दीड हजार रुपयांचा दंड तर केलाच शिवाय अशी तक्रार पुन्हा आल्यास परवाना रद्दचा दमही भरला. ही घटना स्वारगेट बस स्थानकावर घडली.

एसटीच्या बस स्थानकावर ‘नाथजल’ च्या पाणी बॉटल विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. मात्र अनेकदा अधिकृत विक्रेते बस स्थानकावरील सामान्य प्रवाशांचा फायदा घेऊन १५ रुपयांची बॉटल २० रुपयांना विकतात. अनेकदा प्रवासी तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र, अक्षय भूमकर या प्रवाशाने ११ मार्च रोजी स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या प्रकाराची तक्रार स्वारगेटच्या आगार व्यवस्थापककडे केली. त्यानंतर एसटी प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत संबंधित विक्रेते जय काळभैरवनाथ एंटरप्रायझेसकडून दीड हजार रुपयांचा दंड भरून घेतला. तसेच अशी तक्रार पुन्हा आल्यास परवाना रद्द करण्याचा इशाराही दिला. पाच रुपयांचा नफा मिळविण्याचा सोस विक्रेत्याला दीड हजार रुपयांना पडला.

विक्रेता मला १५ रुपयांची असलेली पाण्याची बॉटल २० रुपयांना विक्री करीत होता. मी याबाबत पावती मागितली, तेव्हा त्याने वाद घातला. मी २० रुपये देऊन पाण्याची बाटली विकत घेतली. मात्र, याची तक्रार आगार व्यवस्थापकांकडे केली. प्रवाशांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.
- अक्षय भूमकर, तक्रारदार प्रवासी

एसटी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार विक्रेत्यांनी पदार्थाची विक्री करावी. त्याच्यापेक्षा जास्तीच्या दराने विक्री करत असल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल. प्रवाशांना असा अनुभव आल्यास त्याची तक्रार स्थानक प्रमुख व आगार व्यवस्थापकांकडे करावी. संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.
- सचिन शिंदे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे


‘नाथजल’ ही पाण्याची बॉटल अधिक किमतीने विकली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रवासी अनेकदा तक्रार करण्याची भानगड नको म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. आपल्यालाही असा काही अनुभव आला असल्यास तो आपल्या नावासह क्यूआर कोड स्कॅन करून editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या क्रमांकावर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com