गुढीपाडव्याच्या प्रथांमागे निश्‍चित शास्त्रीय कारणे

गुढीपाडव्याच्या प्रथांमागे निश्‍चित शास्त्रीय कारणे

पुणे, ता. २० ः मराठी नववर्षाचा प्रारंभ करणारा सण म्हणजे गुढीपाडवा. चैत्र प्रतिपदेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाला गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. अनेक वर्षांपासून साजरा केल्या जाणाऱ्या या सणालाही एक शास्त्र आणि परंपरा आहे. यानिमित्त केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रथेमागेही निश्चित शास्त्रीय कारण आहे. त्याचे निसर्गाशी आणि आपल्या प्रकृतीशी नाते आहे. हेच नाते डॉ. सुनील तांबे आणि डॉ. मालविका तांबे यांनी सोमवारी (ता. २०) ‘तनिष्का’ व्यासपीठांतर्गत आयोजित कार्यक्रमात उलगडले. त्याचा हा सारांश.

गुढीपाडवा का साजरा करतात?
गुढीपाडवा हा निसर्गाचा वाढदिवस आहे. कारण या विश्वाचा प्रारंभ झाला, तो हा दिवस आहे. ईश्वराने या विश्वाची निर्मिती करण्याचे नक्की केले, तो हा दिवस. त्यामुळे या दिवशी सूर्य, चंद्र, पूर्व दिशा एका जागी येतात. त्यामुळे आपल्या आईचा वाढदिवस जसा साजरा करू, तसा हा साजरा करायचा, असे डॉ. मालविका तांबे यांनी सांगितले.

गुढीच्या पूजेमागील शास्त्र ः
गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज. हा ब्रह्मध्वज आपले म्हणजे मनुष्याचेच प्रतीक आहे. गुढीसाठी वापरण्यात येणारा बांबू म्हणजे काठी, हे आपल्या मणक्याचे प्रतीक आहे. आपल्या शरीराला ताठ उभे करण्यासाठी जसा मणका गरजेचा असतो, तसेच गुढी उभारण्यासाठी बांबू महत्त्वाचा असतो. यात असलेले वंशलोचन हे हाडांच्या मजबुतीसाठी अतिशय उपयुक्त असते. शरीर केवळ हाडांसह चांगले दिसणार नाही, तर त्यावर मांस चढवावे लागले. तसेच, बांबूना रेशमी वस्त्रादी गोष्टींनी सजवले जाते. त्यावर मस्तकस्वरूप कलश ठेवला जातो, असे डॉ. सुनील तांबे यांनी सांगितले.

गुढी किती उंच असावी?
अनेक ठिकाणी सांगितले जाते की गुढी शक्य तितकी उंच उभारावी. मात्र ते शब्दशः अर्थाने घेऊ नये. गुढी सहा फूट उंच किंवा फार तर सात ते आठ फूट उंच असावी. कारण प्रत्यक्षातील गुढी नव्हे तर आपल्या कर्तृत्वाची गुढी उंच जावी, असा त्यामागील गर्भितार्थ आहे, असे डॉ. सुनील तांबे यांनी सांगितले.

कडुनिंबाची चटणी आणि श्रीखंड का हवे?
गुढीपाडव्याचा सण साखरेचा हार आणि कडुनिंबाची पाने, अशा दोन विरोधी गोष्टींना एकत्र आणत असतो. त्यानंतर श्रीखंड खायला सांगितले आहे. कडुनिंब हे शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असते. वर्षाच्या पहिल्या दिवशी ते खाल्ले तर त्याची सवय होऊ शकते, म्हणूनच गुढीपाडव्याच्या सणाला हे कडवट चवीचे कडुनिंब खायला सांगितले आहे. त्यानंतरचे श्रीखंडही प्रकृतीसाठी आवश्यक आहे. कारण गोडदेखील शरीराला हवे असते, असे डॉ. मालविका तांबे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com