अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईसाठी 
गेलेल्या अतिक्रमण निरीक्षकाला मारहाण

अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण निरीक्षकाला मारहाण

पुणे, ता २१ : ‘रविवार सुटीचा दिवस असतानाही तुम्ही कारवाई कशी करता,’ असा सवाल करीत महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षक व सहायकाला मारहाण केल्याची घटना वारजे परिसरात घडली. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अतिक्रमणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एनडीए मैदानाजवळ अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना अनधिकृत विक्रेत्यांकडून महापालिकेचे अतिक्रमण निरीक्षक अंकुश बादाड यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बादाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नवनाथ वांजळे, रोहन माळशिखरे, सुभाष बोडके, गणेश हुंबरे यांच्यासह इतर चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘परिमंडळ तीन’मध्ये बादाड अतिक्रमण निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी बादाड आपल्या पथकासह वारजे येथील गणपतीमाथा परिसरात पदपथ व रहदारीच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एनडीए मैदानाजवळ रहदारीच्या रस्त्यावर काही भाजी व फळविक्रेत्यांनी रस्त्यावरच विक्री सुरू ठेवल्याने बादाड यांनी त्यांना क्रेट व पथारी काढण्यास सांगितले. मात्र, विक्रेत्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी क्रेट व पथारी उचलण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ‘रविवार, सुटीचा दिवस असल्याने तुम्ही कारवाई कशी करता,’ असा सवाल करून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर बादाड वाहनातून आपल्या मोबाइलद्वारे शूटिंग करीत असताना या अनधिकृत विक्रेत्यांनी त्यांना वाहनातून बाहेर खेचून हाताने व बांबूने मारहाण केली. त्यानंतर बादाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथून सुटका करून घेऊन वारजे पोलिस ठाणे गाठले. बादाड व नीलेश सांबरे यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com