
Itians : आयटीयन्सच्या अडचणीत वाढ! पाठविण्यात आले मेमो
पुणे - कर्मचाऱ्यांनी दररोज ऑफिसमध्ये येऊन काम करावे यासाठीचे कसोशीचे प्रयत्न अजूनही कंपन्यांकडून सुरू आहेत. हायब्रीड पद्धतीने कामकाज सुरू केल्यानंतर काही कर्मचारी अद्यापही या पद्धतीची अंमलबजावणी करत नसल्याचे कंपन्यांच्या निदर्शनात येत आहे. तर काहींना हायब्रीड पद्धत बंधनकारक करण्यात आली आहे. हायब्रीडची अंमलबजावणी न करणाऱ्या आयटीन्सला मेमो पाठविण्यात येत आहे.
कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर अनेक आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन कामकाज करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही बरेच आयटीयन ऑफिसला हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना हायब्रीड पद्धतीचा पर्याय देण्यात आला होता. या पद्धतीनुसार आयटीयन्सने महिन्यातील १२ ते १५ दिवस कार्यालयात येणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मात्र, या-ना त्या कारणांवरून काही आयटीयन ठरलेल्या दिवसांप्रमाणे ऑफिसमध्ये येत नाहीत. तसेच काही बड्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे वर्क फ्रॉम होम करण्यास परवानगी दिली होती. मात्र, आता त्यांना महिन्यातून १२ ते १५ दिवस ऑफिसमध्ये येऊन काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
‘मेमो’मध्ये काय विचारतात?
ठरलेल्या दिवसांची किंवा अचानकपणे सांगितलेल्या हायब्रीड पद्धतीची अंमलबजावणी केली नाही म्हणून आयटीयन्सला मेमो काढण्यात येत आहेत. आपल्याला महिन्यातील काही दिवस ऑफिसमध्ये येऊन काम करणे बंधनकारक आहे. मात्र, त्याची आपण अंमलबजावणी का केली नाही, अशी विचारणा या मेमोच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हायब्रीड पद्धतीने कामकाज न केल्यास आपल्यावर योग्य ती कारवार्इ केली जार्इल, असे या मेमोत नमूद करण्यात आले आहे.
आणखी एक दबावतंत्र?
कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर आयटी कंपन्यांनी आयटीयन्सला कामावर बोलविण्यासाठी अनेक पर्याय अवलंबले. आयटीयन्स घरून मूनलाइटिंग करता, काम चांगल्या पद्धतीने करीत नाहीत, कामावरून कमी करण्याची भीती दाखवली, पगार कपात किंवा पगारवाढ थांबवली, असे अनेक प्रकार केले आहेत. मेमो पाठवणे हाही त्याचाच एक भाग आहे, असे आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या वरिष्ठ आयटीयन्सने सांगितले.
मेमो पाठविण्याची कारणे
- जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊन काम करावे.
- ठरल्या दिवसांप्रमाणे ऑफिसमधून कामकाज केले नाही.
- कर्मचाऱ्यांनी पुन्हा कायमस्वरूपी वर्क फार्म होमची मागणी करू नये.
- हायब्रीड पद्धतीत होत असलेला खर्च कंपन्यांना कमी करायचा आहे.
मे २०२२ मध्ये मला ऑफिसमध्ये येऊन काम करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, मला वर्क फ्रॉम ऑफिस करणे शक्य नव्हते. त्यामुळे मी कंपनीला घरून काम करण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. माझी विनंती मान्य करीत कंपनीने घरून काम करण्यास परवानगी दिली होती. मात्र, मला गेल्या एप्रिल महिन्यात हायब्रीड पद्धतीने काम करण्याची सूचना केली. मी त्यानुसार ऑफिसमध्ये येऊन काम केले नाही म्हणून मेमो काढण्यात आला आहे.
- कनिका, आयटीयन