पत्रास कारण की,
काही सांगायाचे आहे...

पत्रास कारण की, काही सांगायाचे आहे...

प्रिय बाबा, मी पळून जाऊन लग्न केल्यामुळे तुम्हाला फार मोठा धक्का बसलाय, याची मला कल्पना आहे. गेल्या दोन- तीन दिवसांपासून तुम्ही अन्नाला स्पर्शही केला नसल्याचे कळल्यावर मलाही जेवण जात नाही. घरातील प्रत्येक वस्तूंमध्ये मला तुमचा चेहरा दिसतोय. ‘माझ्या कोकरा, सांग तू असं का केलंस? आपल्या लाडक्या बाबाला का फसवलंस?’ असा जाब विचारताय,’ असा मला भास होतोय. त्यामुळे तुमच्याप्रमाणेच मीदेखील इकडे अस्वस्थ आहे. असं वाटतंय, पक्ष्याप्रमाणे उडत येऊन, तुम्हाला भेटावं. तुमच्या पायावर अश्रूंचा अभिषेक घालून, माफी मागावी पण मी घरी आल्यावर आपल्या या लाडक्या कोकराला माफ कराल ना?
बाबा, तुम्हाला न विचारता, मी कधी साधा पेनही विकत घेतला नाही, तुम्हाला न सांगता, मी मैत्रिणीलाही कधी भेटायला गेले नाही आणि आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेताना, तुम्हाला मी अंधारात ठेवलं, याची खंत तुम्हाला आहे. खरं तर मी आडवळणानं माझ्या निर्णयाविषयी अनेकदा सांगितले. मात्र, तुमचा विरोध असल्याचं जाणवल्यावरच मी हा निर्णय घेतला.
बाबा, लहानपणी जत्रेत घोड्यावर बसायचा मी हट्ट धरला. त्यावेळी माझ्या काळजीपोटी तुम्ही नकार दिलात. मात्र, मी भोकांड पसरल्यानंतर कशीबशी माझी समजूत घातली व घरी आल्यानंतर तुम्ही स्वतः घोडा होऊन, घरभर मला फिरवलंत. त्यानंतरही अनेकदा तुम्ही माझा हट्ट पुरवलात. ‘चल मेरे घोडेऽऽऽ’ असं मी म्हटल्यावर घोड्यासारखं खिंकाळत तुम्ही घोडा व्हायचं, हे ठरून गेलं होतं.
मी लहानपणी तापाने फणफणले होते. मला अन्न-पाणी जात नव्हते. मी काही खात नाही म्हणून तुम्हीही उपाशी राहायचा. रात्रभर माझ्या उशाशी बसून, ताप मोजायचा. पंधरा- वीस मिनिटांनी कपाळावरील मिठाच्या पट्ट्या बदलायचात. ‘डॉक्टरसाहेब, माझ्या कोकराला लवकर बरं करा हो ऽऽ’ असं म्हणून डोळ्यांतील अश्रू पुसत काकुळतीने डॉक्टरांना विनवण्या केल्या, हे मी कसं विसरू?
शाळेत जातानाही तुम्हीच मला तयार करायचात. तुमच्यासारखी वेणी घालायला आईलाही कधी जमलं नाही. काल सहज मी लहानपणीचे फोटो पाहिले. तुम्ही माझी घातलेली वेणी पाहून, तुमच्या आठवणीनं मला भडभडून आले. वेणीसारखीच आपली बाप-लेकीच्या नात्याची वीणही घट्ट आहे.
मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यावं, यासाठी मला प्रोत्साहन दिलंत. त्यावेळी नातेवाइकांनी नाकं मुरडली. मात्र, माझ्या कोकरावर माझा विश्‍वास आहे, असं म्हणून तुम्ही त्यांची तोंडं बंद केलीत. शिक्षणाला पैसे कमी पडू लागल्यावर तुम्ही कंपनीत ओव्हरटाइम करू लागलात. मी झोपेत असतानाच तुम्ही कामावर जायचे आणि मी झोपल्यावर यायचे. सकाळी सहाला कामावर जाताना मी झोपेत असताना तुम्ही माझ्या गालावर प्रेमाने हात फिरवायचात. ही मायेची ऊब मला आयुष्यभर पुरेल.
बाबा, मी तुमचा विश्‍वासघात केला म्हणून तुम्ही रागावला आहात, याची मला कल्पना आहे. लोकं काहीही म्हणोत, पण तुमची मान शरमेने खाली जाईल, असं मी कधीही वागले नाही आणि इथूनपुढेही वागणार नाही, याची मी खात्री देते. इतर कोणत्याही प्रेमापेक्षा मला माझ्या बाबांच्या प्रेमाची महती चांगली माहिती आहे. तुमच्या प्रेमाशी आणि विश्‍वासाशी मी कधीही प्रतारणा करणार नाही, याची खात्री बाळगा.

ता. क. ः बाबा, परीक्षेला जाताना तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी कधीही पेपर दिला नाही. मग माझ्या आयुष्याच्या एवढ्या मोठ्या परीक्षेला सामोरे जाताना तुमचा आशीर्वाद नको का? ‘माझ्या लाडक्या कोकरा, मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त एवढंच म्हणा.’
कळावे, तुमचं लाडकं कोकरू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com