जात वैधता प्रमाणपत्र सादर   
करण्यास एक वर्षाची मुदत

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदत

पुणे, ता. २१ : गावगाडा हाकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून गाव कारभारी बनलेल्या राखीव प्रवर्गातील विजयी उमेदवारांना आता त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी राज्य सरकारने दिला आहे. यामुळे हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत आणखी सहा महिन्यांचा कालावधी मिळाला आहे.
केवळ मुदतीत हे प्रमाणपत्र सादर न केल्याने अनेक गाव कारभारी हे अपात्र ठरत असत आणि त्यांचा पदावरून पायउतारही होत असत. या नव्या मुदतवाढीमुळे केवळ या प्रमाणपत्राच्या मुद्यावरून कोणालाही गाव कारभारी पदावरून पायउतार व्हावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयाने विविध राखीव संवर्गातून सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या कारभाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने याआधी गेल्या वर्षीच्या (२०२१) निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. पूर्वीच्या तरतुदीनुसार हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कमाल सहा महिन्यांची मुदत मिळत असे. या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट) मिळणे तसे मोठे जिकिरीचे काम झाले होते. अनेकांना तर या मुदतही ते मिळविता येत नसे. परिणामी जनतेतून निवडून येऊनही केवळ जात वैधता प्रमाणपत्रामुळे त्यांना हे पद गमवावे लागत असे. या मुदतवाढीमुळे आता राखीव संवर्गातून निवडून आलेल्या सरपंचांना किंवा ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचे पद गमवावे लागणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) भटक्या जाती, जमाती (व्हीजेएनटी) किंवा नागरिकांच्या (ओबीसी) प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांना निवडणूक निकालानंतर पूर्वी सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. ते आता एक वर्षाच्या आत सादर करावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com