दिव्यांग, ज्येष्ठांच्या वेदनेचा ‘प्रवास’

दिव्यांग, ज्येष्ठांच्या वेदनेचा ‘प्रवास’

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २५ ः देशातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून मिरविणाऱ्या व ‘अ’ स्थानकाचा दर्जा असलेल्या पुणे स्थानकावर दिव्यांग, ज्येष्ठांसाठी केवळ एकच व्हीलचेअर उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वाट पाहूनदेखील व्हीलचेअर मिळत नसल्याने अनेक जण तेथील हमालांची अथवा नातलगांची मदत घेऊन रेल्वे डब्यांत चढतात व फलाटावरून बाहेर पडतात. मात्र त्यासाठी त्यांना हजार-पाचशे मोजावे लागत आहेत, तर काही जण व्हीलचेअरच्या प्रतीक्षेत थांबून राहतात.
‘व्हीलचेअर’ मिळत नसल्याने दिव्यांग व ज्येष्ठांची हेळसांड होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने चालविलेली ही क्रूरचेष्टा थांबवावी, अशी मागणी प्रवासी करत आहे.
पुणे स्थानकावरून रोज दोनशेहून अधिक रेल्वेगाड्यांमधून सुमारे दीड लाख प्रवासी करतात. यात रोज हजारो दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. मात्र त्यांच्याविषयी संवेदना हरवली की काय? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. दिव्यांग प्रवासी व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातलगांची व्हीलचेअर मिळविण्यासाठी धडपड सुरू असते. दिवसातून किमान साठ ते सत्तर प्रवासी व्हीलचेअरची मागणी उपस्थानक व्यवस्थापक (वाणिज्य ) यांच्याकडे करतात. मात्र यातील काहींनाच व्हीलचेअर मिळते. उर्वरित प्रवाशांच्या नशिबी वेदना सहन करतच जावे लागते.

स्थानकावर या गैरसोयी
१. पाण्याचे एटीएम बंद असल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते.
२. स्थानकावर एकही लिफ्ट नाही.
३. स्थानकावर तीन सरकते जिने, तर फलाट सहा. प्रवाशांची संख्या लक्षात घेता तेदेखील अपुरे.
४. अनेकदा सरकता जिना बंद असतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय
५. सामाजिक संस्थांकडून सुरू झालेल्या इलेक्ट्रिक गाड्यादेखील बंद
६. तीन वर्षांपासून बंद असलेले रॅम्प सुरू; मात्र अधूनमधून त्याचे गेटदेखील बंद

पुणे स्थानकावर किती व्हीलचेअर आहेत, याची माहिती नाही. माहिती घेऊन सांगते. मात्र प्रवाशांना सुविधा मिळाव्यात म्हणून योग्य ते प्रयत्न केले जातील. प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ.
- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

प्रवाशांना सुविधा पुरविणे ही रेल्वेची प्राथमिकता असली पाहिजे. छोट्या गोष्टीसाठीदेखील तक्रार करावी लागते, हे फार लाजीरवाणी आहे.
- अश्विनी इंदापुरे, प्रवासी

मी माझ्या नातलगांना आणण्यासाठी पुणे स्थानकावर आलो होतो. माझे नातलग हे दिव्यांग आहेत. त्यांना व्हीलचेअर गरजेची होती. स्थानकावर चौकशी केली असता, केवळ एकच व्हीलचेअर असल्याचे कळले. त्याचे चाकदेखील खराब झाले होते. हा माझ्यासाठी खूपच वाईट अनुभव होता.
- नीलेश खांडवेकर, दिव्यांग प्रवाशाचे नातलग

‘सतत परोपकार करा,’ असा उपदेश संत तुकाराम महाराजांनी आपल्या अनेक अभंगातून केला आहे. परोपकार म्हणजे जो कोणी अडचणीत असेल त्याला यथाशक्ती मदत करणं. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी हे तर सर्वसामान्यत: गृहीतच आहे. संतपरंपरेनुसार कोणाही गरजवंताला मदत करणं पुण्य समजलं जातं. त्यामुळे दिव्यांग अन् ज्येष्ठांनाही रेल्वे प्रशासनाने मदत करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com