‘जी-२०’च्या जून महिन्यात दोन बैठका

‘जी-२०’च्या जून महिन्यात दोन बैठका

पुणे, ता. ६ ः पुणे शहरात जानेवारी महिन्यात ‘जी-२०’ परिषदेची बैठक झाल्यानंतर जून महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि शिक्षण या विषयावरील दोन बैठका होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून, प्रमुख २१ रस्त्यांची सुधारणा, सुशोभीकरण आणि शहर स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे. दरम्यान, नऊ मे रोजी केंद्रीय पथक पुण्यात येऊन तयारीचा आढावा घेणार आहे.
या वर्षी भारताकडे ‘जी-२० परिषदे’चे अध्यक्षपद आलेले आहे. जानेवारी महिन्यापासून देशाच्या विविध शहरांमध्ये यासंदर्भात बैठका होत आहेत. त्यासाठी जी-२० च्या सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी व भारताने निमंत्रित केलेल्या देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहत आहेत. एकूण ४० शहरांत २०० पेक्षा जास्त बैठका घेण्याचे नियोजन आहे.
१२ व १४ जून या कालावधीत इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर बैठक होणार आहे, तर १९ ते २२ जून दरम्यान शिक्षण विषयावर बैठक होईल. सात दिवस ‘जी-२०’ सदस्य देशांचे प्रतिनिधी पुण्यात मुक्कामी असणार आहेत.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘बैठकीची संभाव्य ठिकाणे, सुविधांची, मार्गांची पाहणी केली जाणार आहे. येथे सहभागी होणारे सदस्य पुण्यातील पर्यटन व वारसास्थळांना भेटी देणार आहेत. त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही नियोजन आहे. शहराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. रस्त्यांची डागडुजीही केली जाणार आहे. यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली जाईल. तसेच कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही (सीएसआर) मदत घेतली जाईल.’’

स्वच्छतेसाठी पुन्हा कारवाई
जी-२० परिषदेच्या निमित्ताने रस्ते, पादचारी मार्ग, दुभाजक स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केलेले जातात. रंगरंगोटी व सुशोभीकरण केले जाते. पण बेशिस्त नागरिक पान, गुटखा खाऊन थुंकत असल्याने पुन्हा अस्वच्छता होते. त्यासाठी जानेवारी महिन्यात थुंकणाऱ्यांवर कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा ही कारवाई सुरू केली जाईल, असे कुमार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com