तापमान बदलाचा आरोग्यावर परिणाम

तापमान बदलाचा आरोग्यावर परिणाम

पुणे, ता. ६ ः शहर व परिसरात ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण निर्माण होत आहे. त्यातच दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री व पहाटे जाणवणाऱ्या थंडीमुळे तापमानात चांगलीच तफावत होत आहे. या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत असून विषाणुजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्दी-खोकला, अंग दुखी, ताप, नाक वाहणे आदी लक्षणे असलेल्या रुग्‍णांची संख्या वाढत आहे.
गेल्या आठवड्यापासून शहर परिसरात पावसाची ये-जा कायम आहे. दिवसा कमाल तापमानाच्या वाढलेल्या पाऱ्यामुळे उन्हाचा ताप वाढू लागला असून दुपारनंतर पुन्हा अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होत आहे. याबाबत संसर्गजन्यरोग तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, ‘‘शहरातील सध्याचे वातावरण हे संसर्गजन्य आजारांसाठी पूरक ठरत आहे. दिवसा ३५ अंश किंवा त्यापेक्षा अधिक तापमानाचा पारा असतो, आणि दुपारी पुन्हा पावसाच्या सरी पडल्यावर रात्री तापमानात घट होते. गेल्या १० दिवसांपासून हे चित्र कायम आहे. यामुळे तापाच्या रुग्णांची चाचणी करताना त्यात स्वाईन फ्लू, इन्फ्‍लुएन्झा, काही प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येतात. मूत्रपिंड विकार, कर्करोगाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांना न्यूमोनिया देखील होत आहे. त्यांच्या वैद्यकीय समस्या वाढत असून त्यांना आयसीयूमध्‍ये ठेवण्याची वेळ येत आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाण ज्येष्ठ नागरिकांचे आहे.’’

दिवसा ऊन, रात्री थंडी हा विषम हवामानाचा प्रकार आहे. हे वातावरण विषाणूंच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असल्याने अनेकांना विषाणुजन्य आजार किंवा ताप येत असल्याचे आढळून येत आहे. अशा वातावरणाचा सर्वाधिक जास्त धोका सहव्याधी असलेल्या आणि ज्येष्ठांना आहे. बऱ्याचदा उन्हाळ्यात बाहेरचे पेय किंवा खाद्य पदार्थ खाल्ले जातात. यामुळे पोटाचे संसर्ग लोकांना होत आहेत. आता उन्हाळी सुट्ट्या असल्याने मुले तासनतास उन्हामध्ये खेळतात. त्‍यामुळे पालकांनी त्यांची काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. संजीव वावरे,
सहाय्यक आरोग्य प्रमुख, महापालिका

सध्या सकाळच्या कालावधीत उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे आम्ही मुलांना शक्यतो सायंकाळीच खेळण्यासाठी बाहेर पाठवितो. त्यामुळे त्यांना उन्हापासून होणाऱ्या कोणत्याही आजाराचा संसर्ग होत नाही. पालक म्हणून आपणही मुलांची काळजी घ्यायला हवी.
- रूपाली काळंगे, सिंहगड रस्ता

या समस्या सर्वाधिक....
- श्र्वसनाच्या संसर्गाचे प्रमाण जास्त
- पोटाचा संसर्ग किंवा व्हायरल गॅस्ट्रोएंट्राइटिस
- उन्हाच्या तीव्र झळांमुळे उष्माघाताचा धोका
- विषाणुजन्य आजार किंवा ताप


हे करा...
- दिवसभरात किमान ४ लिटर पाणी प्या
- कोरोनाबरोबरच संसर्गजन्य आजारांसाठी आवश्‍यक लसीकरण करणे
- बाहेरून आल्यावर थंड पाणी पिऊ नये
- बाहेर पडताना शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे, स्कार्फ आणि टोपी वापरणे
- लहान मुलांना दीर्घकाळ उन्हामध्ये थांबू देऊ नये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com