उजेडाच्या नावाखाली लावले ‘दिवे’!

उजेडाच्या नावाखाली लावले ‘दिवे’!

पुणे, ता. १२ ः महापालिकेने वीज बचत करण्यासाठी ‘महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) सोबत करार केलेला आहे. मात्र, महाप्रितकडून नवे पथदिवे उपलब्ध झालेले नसतानाही विद्युत विभागाने पथदिवे बदलण्याची उठाठेव सुरू केली आहे. त्यामुळे सिंहगड रस्ता व सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चालू स्थितीत असलेले साडेतीन हजार पथदिवे बदलल्याने महापालिकेला साडेदहा लाख रुपयांचा भूर्दंड पडणार आहेत.

महिनाभराची प्रतिक्षा
महाप्रिततर्फे या भागातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असले तरी दिल्ली येथील एका त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून घेतल्यानंतर दिवे लावले जाणार आहेत. त्यासाठी या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दिवे लावण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. पण विद्युत विभागाने टाटा कंपनीचे दिवे काढून घेण्यास सुरवात केली आहे. तेथे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जुने दिवे आणून बसविले जात आहेत. एक दिवा काढून तो बसविण्यासाठी ठेकेदाराला ३०० रुपये द्यावे लागणार आहेत. पण पुन्हा एका महिन्याने हे दिवे काढून टाकावे लागणार आहेत. म्हणजे एकच काम दोन वेळा करावे लागणार आहे. पण यासाठीचा ठेकेदाराला साडेदहा लाख रुपयांचे द्यावे लागणार असल्याचे विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

आकडे बोलतात
- पुणे महापालिकेच्या वास्तू, मैलापाणी प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, पथदिवे यासह इतर ठिकाणी वर्षभरात २९.१० कोटी वीज युनिट विजेच्या वापरासाठी १५३ कोटी रुपये वीजबिल भरावे लागत आहे.
- या वीज बिलात बचत झाल्यास त्यातील ८० टक्के रक्कम ‘महाप्रित’ला तर २० टक्के रक्कम महापालिकेला मिळणार आहे.
- पुणे शहरात एकूण एक लाख ८० हजार पथदिवे आहेत. त्यातील ९० हजार पथदिव्यांवर टाटा कंपनीचे फिटिंग (दिवे) आहेत. - आणखी पाच वर्ष या कंपनीकडे हे दिवे आहेत. तर उर्वरित ९० हजार पथदिव्यांची देखभाल महापालिका करत असून, हे पथदिवे महाप्रितच्या ताब्यात दिले जाणार आहेत.
- पहिल्या टप्प्यात सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय आणि सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असणारे प्रत्येकी १० हजार पथदिवे ‘महाप्रित’कडे दिले जाणार आहेत.
- पण सध्या या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील ३५०० ‘टाटा’ कंपनीचे फिटिंग काढण्याचे काम सुरू झाले आहे.

पुणे महापालिकेने धायरीतील सुमारे ५५० दिवे बदलले आहेत. त्यातील काही ठिकाणचे दिवे बंद आहेत. चालू दिवे काढून बंद दिवे का काढले जात आहेत याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली तरी त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. याची चौकशी केली पाहिजे.
- महेश पोकळे, विभाग प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

सहकारनगर व सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महाप्रितचे फिटिंग बसविले जाणार असल्याने येथील टाटा कंपनीचे फिटिंग काढून ते ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बसविले जात आहेत. महाप्रितचे दिवे येण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात बिबवेवाडी येथील ३५०० दिवे सहकारनगर, सिंहगड रस्ता भागात लावले जाणार असून, यासाठी ठेकेदाराला प्रति फिटिंग ३०० रुपये दिले जाणार आहेत. हे सर्व दिवे सुरू आहेत, तसेच महापालिकेचे नुकसान नाही.
- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता विद्युत विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com