नाले सफाई होणार वेगात

नाले सफाई होणार वेगात

पुणे, ता. १३ : शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यात पाणी तुंबणाऱ्या नव्या ठिकाणांचाही शोध पावसाळ्यापूर्वी लागला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी चार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
महापालिकेकडून शहरात पावसाळीपूर्व कामे करण्यात येत आहेत. मलःनिसारण विभागाकडून पावसाळी गटारे आणि नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले आहे. तसेच ही कामे करताना शहरात पाणी साचू नये यासाठी क्षेत्रीय कार्यालये, मलःनिसारण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांची संयुक्‍त बैठक घेण्यात आली. त्यावेळी परिमंडळाच्या उपायुक्तांनी निधीची आवश्‍यकता असल्याचे सांगितले होते.
शहरात पावसानंतर पाणी साचणाऱ्या १५७ ठिकाणांची यादी मलःनिसारण विभागाने तयार केली आहे. त्यातील, काही ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयांकडून काम करणे शक्‍य आहे. पण क्षेत्रीय कार्यालयांना आधीच निधी कमी असल्याने या कामासाठी स्वतंत्रपणे निधी द्यावा, अशी मागणी परिमंडळाच्या उपायुक्तांनी बैठकीत केली होती. त्यानुसार पाच परिमंडळांच्या अंतर्गत येणाऱ्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी चार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेल्या निधीतून चार कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे दिले जाणार आहेत. गेल्या वर्षभरात २०० पेक्षा जास्त पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर उपाय योजना केल्या. तरीही आता नव्याने १५७ ठिकाणे आढळली आहेत. हा निधी याकामासाठी वापरला जाईल.

पावसाळ्यापूर्वी तातडीची कामे करण्यासाठी पाच परिमंडळांच्या माध्यमातून १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी चार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. परिमंडळाच्या उपायुक्तांनी निधीची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांपुढे प्रस्ताव ठेवला आहे.
- महेश पाटील,
उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com