भरतनाट्यम् नृत्य शैलीचा आईकडून मिळालेला वारसा

भरतनाट्यम् नृत्य शैलीचा आईकडून मिळालेला वारसा

जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने आज (ता. १४) मायलेकींमधील कलात्मक भावबंध जाणून घेऊया. पुण्यातील प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार अरुंधती पटवर्धन व त्यांची मुलगी सागरिका या मायलेकी रंगमंचावर अनेक नृत्य संरचना सादर करतात.

‘‘ख्यातनाम नृत्यांगना डॉ. सुचेता चापेकर यांच्याकडून माझ्याकडे आलेला भरतनाट्यम शैलीचा वारसा माझी मुलगी सागरिका हिने घेतला आहे, याचे खूप समाधान वाटते. आईने मला नृत्याची सक्ती केली नव्हती तशीच मीही माझ्या मुलीला केली नाही. तान्ही असतानापासून ती माझा रियाझ व क्लासमध्ये शिष्यांना शिकवताना मला बघते आहे. तिला वाचन व खेळांची ओढ आहे. इयत्ता पाचवीत असताना तिला भरतनाट्यम रीतसर शिकावेसे वाटू लागले. आता ती बारावीत आहे. मधल्या वर्षांमध्ये तिने झपाट्याने या कलेत प्रगती केली. माझ्या आईने यात केलेल्या संशोधनपर अभ्यासाबद्दल तिला कुतूहल वाटते. मी तिची आई व गुरू असले तरी तिच्या वाचनातून अनेक नव्या गोष्टी मला कळतात,’’ असे अरुंधती म्हणाल्या.

सागरिकाने सांगितले की, आजी व आईकडून माझ्यापर्यंत पोचलेले भरतनाट्यम, ही केवढी समृद्ध परंपरा मला अनुभवायला मिळते आहे, याचे महत्त्व आता कुठे माझ्या लक्षात येऊ लागले आहे. आईने यासाठी मला आग्रह केला नाही. पण ती म्हणाली की, ही भारतीय नृत्य परंपरा तू जाणून घे. याचे महत्त्व समजून घे. मग तू ते नंतर सुरू ठेव किंवा ठेवू नकोस. एखादे वर्ष याला द्यावे, असे मी ठरवले. आजीचा सखोल अभ्यास व आईच्या कोरिओग्राफीतून तिचा नृत्यविचार मला भावला. या नृत्य शैलीतील सुंदरतेने मी प्रभावित झाले. जेवढे समजून घ्यावे तेवढे यात नवीन सापडत जाते. ‘लय कवितई’सारख्या रचना मी व आई मिळून रंगमंचावर सादर करतो. ‘गीत गोपाल’सारख्या रचना काही वेळा आजी, आई व मी तर कधी मी आणि आईने युगल स्वरूपात प्रस्तुत केल्या आहेत. आईबरोबर मुलगी, शिष्या व सहकलाकार या तिन्ही नात्यांमध्ये फार समृद्धी जाणवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com