‘हर घर सावरकर’ रविवारपासून अभियान

‘हर घर सावरकर’ रविवारपासून अभियान

पुणे, ता. १८ ः हर घर सावरकर समितीच्या वतीने ‘हर घर सावरकर’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन येत्या रविवारपासून (ता. २१) याची सुरवात रायगड किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे देवव्रत बापट आणि सूर्यकांत पाठक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी मोहन शेटे, संदीप सोहनी, श्र्वेता वैद्य, अनिल गानू व प्रियांका पुजारी उपस्थित होते. यावेळी बापट म्हणाले, ‘‘या अभियानानिमित्त १०० गिर्यारोहक रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन व आरती करत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. त्याचबरोबर गिर्यारोहक ७५ क्रांतिकारकांच्या प्रतिमा घेऊन कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. या अभियानाच्या उद्‍घाटनप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार भरत गोगावले उपस्थित राहणार आहेत.’’
समितीतर्फे नुकतीच मुंबई येथे सामंत यांच्या अध्यक्षतेखाली समितीतर्फे शिखर परिषद झाली. या परिषदेत तीन ठराव संमत करण्यात आले. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करणे, महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समग्र वाङ्मय खंड स्वरूपात उपलब्ध करून देणे आणि सावरकर यांचे तैलचित्र शाळा तसेच सरकारी कार्यालयात लावण्याची व्यवस्था करणे, या ठरावांचा समावेश आहे. या ठरावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामंत यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्याचे यावेळी समितीतर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com