राहुल नार्वेकरांची ‘वेळ’ न्यायालय पाहातंय

राहुल नार्वेकरांची ‘वेळ’ न्यायालय पाहातंय

पुणे, ता. १८ ः ‘‘सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना किमान पुरेसा वेळ (रिजनेबल टाइम) दिला आहे. नार्वेकर हे आणखी किती वेळ घेतात, याची सर्वोच्च न्यायालयच वाट पाहत आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालास बगल देण्याचे काम केले आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ‘‘नार्वेकर आमचे जावई आहेत, ते तसे करणार नाहीत, आमचा त्यांच्यावर विश्‍वास आहे,’’ असा चिमटाही त्यांनी काढला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक गुरुवारी पत्रकारनगर येथील कामायनी सभागृहात झाली. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, अंकुश काकडे, ॲड. जयदेव गायकवाड, प्रदीप देशमुख, दीपाली धुमाळ, उदय महाले, ॲड. नीलेश निकम आदी उपस्थित होते. पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना बूथ समित्या तयार करून सर्वसामान्यांना जोडण्याबाबत मार्गदर्शन केले.
पाटील म्हणाले, ‘‘देशातील नागरिकांचा भाजपवर किती राग आहे, हे कर्नाटकच्या निवडणुकांमधून स्पष्ट झाले आहे. भाजप आता लोकप्रिय पक्ष राहिलेला नाही. तो सर्वसामान्यांचा नव्हे, तर धनिकांची पाठराखण करणारा पक्ष म्हणून त्यांची गणना होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. मात्र भाजप निवडणुका लांबवत जाण्याचे काम करत असून त्याला राष्ट्रवादीला जबाबदार धरत आहे.’’
बूथ समित्यांबाबत ते म्हणाले, ‘‘बूथ समित्या तयार करून विधानसभानिहाय प्रत्येक वॉर्डमध्ये बैठका घेण्यास प्राधान्य द्या. त्यात सर्व नागरिकांना व्यक्त होण्यासाठी संधी द्या. ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या संकल्पनेलादेखील सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम करा.’’

पुण्यात राष्ट्रवादीला पुन्हा संधी
पुण्यात नागरिकांनी भाजपला संधी देऊन पाहिले, आता राष्ट्रवादीला मोठी संधी असून महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने करेल. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडून येतील. त्या दृष्टीने तरुणांना, महिलांना चांगला वाव द्या, असेही पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com