शहरात सात ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार

शहरात सात ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार

पुणे, ता. २० ः शहरातील रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण, त्यामुळे उद्‌भवणारे वादाचे प्रसंग आणि अपघाताच्या घटना टाळण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात सात ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार भरविण्यात येणार आहे. बाणेर, आंबेगाव, धानोरी, कळस, खराडी आदी सात ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार भरविण्यास प्राधान्य देणार आहे.

हडपसर परिसरात कांदा विक्री करणाऱ्या एका शेतकऱ्याचा टेम्पो महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली होती. त्याविरुद्ध माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महापालिकेसमोर कांदा विक्री आंदोलन केले होते. संबंधित आंदोलनाची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गांभीर्याने दखल घेत शहरातील नागरीकांना ताजा भाजीपाला, फळे मिळावीत आणि शेतकऱ्यांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास न होता कायदेशीररीत्या शेतीमाल विक्री करण्याची परवानगी मिळावी, यासाठी शेतकरी आठवडे बाजार सुरु करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार, महापालिकेने शेतकरी आठवडे बाजारास मान्यता दिली आहे.

फळे, भाजीपाला वाजवी दरात
राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिकेकडून ‘अर्बन फूड पायलट’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे, या पथदर्शी प्रकल्पातील शेतकरी आठवडे बाजारांच्या दर्जामध्ये सुधारणा करून, नागरीकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला दर मिळावा, यासाठी शेतकरी आठवडे बाजारास प्राधान्य दिले आहे.

येथे भरणार बाजार
१) बाणेर ओटा मार्केट
२) वडगाव बुद्रूक येथील सन सिटी ओटा मार्केट
३) आंबेगाव बुद्रूक ओटा मार्केट
४) खराडी ओटा मार्केट
५) वडगाव शेरी येथील पुण्यनगरी ओटा मार्केट
६) कळस येथील कुरुंजाई ओटा मार्केट
७) धानोरी ओटा मार्केट

शेतकरी उत्पादक कंपनीला एक दिवस
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या संस्थेमार्फत निवडलेल्या समुदाय आधारित संस्थांना (सीबीओ) व शेतकरी उत्पादक कंपनीला ओटा मार्केट आठवड्यातील एक दिवसासाठी उपलब्ध करून देणार आहे. महापालिका हद्दीतील विविध ठिकाणच्या ठराविक मोकळ्या जागांवर आठवडे बाजार भरविण्यासाठीचा प्रस्तावही महापालिकेकडे आला आहे.


शेतकरी आठवडे बाजार उपक्रमाद्वारे नागरिकांना स्वच्छ, ताजी, विषमुक्त, फळे व भाजीपाला वाजवी दरात मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यासाठी हक्काची जागा अल्प दरात उपलब्ध होणार आहे. तरी नागरिकांनी महापालिकेच्या ओटा मार्केटमध्ये जाऊन फळे व भाजीपाल्याची खरेदी करावी. तसेच, या योजनेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
- आशित जाधव,
कार्यकारी अभियंता, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com