अध्यापकांच्या मानधनात वाढ

अध्यापकांच्या मानधनात वाढ

पुणे, ता. २७ : राज्यातील शासकीय कला महाविद्यालयात तासिका तत्त्वावर तसेच अभ्यागत अध्यापकांना देण्यात येणाऱ्या मानधनात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वाढ केली आहे. त्यामुळे शासकीय कला महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील तसेच अभ्यागत अध्यापकांना ही मानधन वाढ मिळू शकणार आहे. परंतु अनुदानित कला महाविद्यालयांमधील अध्यापकांची मानधन वाढ, रिक्त पदे याबाबत सरकार कोणतीही भूमिका घेत नसल्याने अध्यापकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या राज्यातील तीन शासकीय कला महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्त्वावरील तसेच अभ्यागत अध्यापकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ देण्यात आली आहे. या महाविद्यालयात पदवी, पदविका, पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ अभ्यागत आणि तासिका तत्त्वावरील अध्यापकांना ही मानधन वाढ मिळणार आहे. परंतु मुळात कला महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत अध्यापकांची संख्या कमी असून अनेक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. याबाबत सरकारने कोणतीही स्पष्टता अद्याप न केल्याने अध्यापकांनी नाराज आहेत. दरम्यान, तासिका तत्त्वावरील तसेच अभ्यागत अध्यापकांना हे मानधन देण्यासंदर्भातील सूचनाही राज्य सरकारने नव्या निर्णयात जाहीर केल्या आहेत. तसेच हे सुधारित मानधन एक एप्रिल २०२३ पासून अमलात येणार आहे.

तासिका तत्त्वावरील अध्यापक असे निवडावेत
- सेवानिवृत्त अध्यापक वा संबंधित अभ्यासक्रमाशी निगडित व्यवसायातील तज्ज्ञ व्यक्ती यांना तासिका तत्त्वावरील अध्यापनासाठी निमंत्रित करावे
- कला संचालकांच्या मान्यतेने महाविद्यालयांनी जाहिरात देऊन अध्यापकांची स्थानिक निवड समितीमार्फत निवड करावी
- निवड समितीत संबंधित महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, विभागप्रमुख व एक बाह्य विषय तज्ज्ञ असावा
- तासिका तत्त्वावरील अध्यापकांची एका शैक्षणिक वर्षासाठी अधिकतम नऊ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करता येईल
- एका पूर्णवेळ रिक्त पदासाठी फक्त दोनच तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नेमणुका करता येतील
- एका अध्यापकाकडे जास्तीत जास्त नऊ तासिकांचा कार्यभार सोपविता येईल

असे आहे सुधारित मानधन
अभ्यासक्रमाचा प्रकार : सध्याचे मानधन प्रति तास (सैद्धांतिक/प्रात्यक्षिके) : सुधारित मानधन प्रति तास (सैद्धांतिक/प्रात्यक्षिके)
१. उद्योग/व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित केलेले तज्ज्ञ, अनुभवी ज्येष्ठ व्यवस्थापक : ७५० रुपये : १५०० रुपये/७५० रुपये
२. पदवी/पदव्युत्तर पदविका/पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम : ६२५ रुपये/३०० रुपये : ९०० रुपये /७५० रुपये
३. पदविका अभ्यासक्रम : ६२५ रुपये/२५० रुपये : ९०० रुपये/७५० रुपये

राज्य सरकारने कला महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ केल्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु त्यापूर्वी सरकारने या महाविद्यालयातील रिक्त असणाऱ्या पूर्णवेळ अध्यापकांची पदे अगोदर भरणे आवश्यक आहे. कला महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने पावले उचलणे अपेक्षित आहे.
- राहुल बळवंत, प्राचार्य, अभिनव कला महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com