
थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित
पुणे, ता. २८ : पुणे परिमंडलातील सर्व वर्गवारीतील सुमारे ५ लाख ११ हजार ६१४ वीजग्राहकांकडे अद्यापही १०२ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणकडून आतापर्यंत २२ हजार ८१६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पुणे शहरात एकूण २ लाख १५ हजार ४५४ वीजग्राहकांकडे ३३ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख ८८ हजार २९५ ग्राहकांकडे २४ कोटी ८७ लाख रुपये, वाणिज्यिक २५ हजार ४६८ ग्राहकांकडे ७ कोटी ५२ लाख रुपये, औद्योगिक १ हजार ६९१ ग्राहकांकडे ९४ लाख ६४ हजार रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २७ दिवसांमध्ये पुणे शहरातील १६ हजार ८० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १ लाख ४ हजार ७७० वीजग्राहकांकडे २४ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती ८९ हजार २७६ ग्राहकांकडे १३ कोटी ९८ लाख रुपये, वाणिज्यिक १२ हजार ३८४ ग्राहकांकडे ५ कोटी ६७ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार ११० ग्राहकांकडे ४ कोटी ८६ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २७ दिवसांमध्ये पिंपरी चिंचवडमधील ३ हजार ६१६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
तर ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण १ लाख ९१ हजार ३९० वीजग्राहकांकडे ४४ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख ७२ हजार ९५२ ग्राहकांकडे ३१ कोटी ४८ लाख रुपये, वाणिज्यिक १५ हजार ८९४ ग्राहकांकडे ८ कोटी १४ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ५४४ ग्राहकांकडे ४ कोटी ७६ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर या महिन्यात आतापर्यंत ३ हजार १२० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे. यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे गुरुवारी (ता. ३०) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइट व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले.