भाजप कार्यकर्त्यांवर शोककळा

भाजप कार्यकर्त्यांवर शोककळा

सकाळ वृत्तसेवा
पुणे,ता. २९ : पुणे शहराचे खासदार आणि पक्षात ‘हेडमास्तर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांवर बुधवारी शोककळा पसरली. कार्यकर्ता निर्माण करणारी फॅक्टरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षावर दिर्घकाळ वचक ठेवणाऱ्या या नेत्याच्या अचानक जाण्यामुळे भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बापट यांच्या निधनाने शहर भाजपची मोठी हानी झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांचे ते आधार होते. त्यांच्या पोकळी भाजपला नक्की जाणवेल, अशा शब्दात आमदार माधुरी मिसाळ यांनी भावना व्यक्त केली. तर आमदार भिमराव तापकीर म्हणाले, ‘‘भाजपच नव्हे, सर्व पक्षियांमध्ये बापट यांचे चांगले संबंध होते. विधानसभेत काम करताना त्यांचे कायम मार्गदर्शन मला लाभले. त्यांच्या जाण्याने पक्षाबरोबरच माझी स्वत:ची हानी झाली आहे’’
‘‘बापट हे सर्वसामान्य सामान्य नागरीकांचे नस ओळखणारे नेते होते,’’ असे सांगून आमदार सुनील कांबळे म्हणाले, ‘‘सर्वसमान्यांशी त्यांची नाळ जोडली गेली होती. त्यांचा जनसंपर्कही मोठा होता. अशा नेत्याच्या निधनामुळे शहर भाजपला त्यांची उणीव जाणवेल.’’ तर आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘‘बापट यांच्या निधानामुळे शहराचे, पक्षाचे आणि माझे वैयक्तिक हानी झाली आहे. लोकांमधील प्रभावी नेता आणि माझे गुरू यांच्या अतुलनीय कार्याचा वारसा आमच्या सोबत कायम राहिल.’’ माजी आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘भाऊंचे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध होते. राजकारणात कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आर्शिवाद मला लाभले. त्यांच्या जाण्याने शहर भाजप पोरके झाले आहे.’’
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘‘पुणे शहराच्या राजकारणाची आणि समाजकारणाची नस माहित असलेले गिरीशभाऊं सारखे नेते मला लाभले, हे मी माझे भाग्य समजतो. त्यांचे निधन अत्यंत वेदनादायी आहे.’’ माजी सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, ‘‘भाऊंचे संघटन कौशल्य, राजकीय चौकटी पलिकडचे संबंध आम्हा सर्वांसाठी दिशादर्शक होते. संपूर्ण आयुष्य त्यांनी जनतेसाठी आणि पक्षासाठी समर्पित करणारे नेतृत्व म्हणजे भाऊ.’’ चाळीस वर्षांहून अधिक काळ नगरसेवक ते खासदार असा यशस्वी प्रवास करणारे बापट होते. राजकारणापलिकडे मैत्री जपणारे बापट हे एकमेव लोकनेते होते,’’ अशी शब्दात माजी सभागृह नेते धीरज घाटे यांनी बापट यांना श्रद्धांजली वाहिली.

कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता होता. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नावाने ओळखणार हा नेता होता. शहरातील सर्व स्तरात भाजप पोचविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, पुणे भाजप

पुण्याच्या विकासात महत्वाचे योगदान देतानाच राजकीय संस्कृतीचा वस्तुपाठही बापट यांनी घालून दिला. जो सर्वच पक्षात काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
- मुरली मोहोळ, माजी महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com