पंतप्रधान आवास योजनेचे 
काम जुलैमध्ये पूर्ण होणार

पंतप्रधान आवास योजनेचे काम जुलैमध्ये पूर्ण होणार

पुणे, ता. २९ ः पुणे महापालिकेतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधली जात आहे. या २ हजार ९१८ घराच्या प्रकल्पांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. खराडी आणि वडगाव खुर्द येथील प्रकल्पाचे काम २० जूनपर्यंत पूर्ण होईल, तर हडपसर येथील काम ५ जुलैपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लाभार्थ्यांना घरे ताब्यात देण्याची तारीख जाहीर केली जाणार आहे.

शहरात घरांच्या किमती वाढत असताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना घर खरेदी करणे अशक्य होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे या गटातील नागरिकांसाठी घर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये हडपसर सर्वे क्रमांक १०६ अ येथे ३४० सदनिका, १०० सदनिकाचे दोन प्रकल्प, तर हडपसर सर्वे क्रमांक ८९ येथे ५८४ सदनिकांचा प्रकल्प बांधला जात आहे. खराडी येथील सर्वे क्रमांक ५७ मध्ये ७८६ आणि वडगाव खुर्द येथे सर्वे क्रमांक ३९ येथे १ हजार १०८ सदनिका बांधल्या जात आहेत. ‘रेरा’कडे केलेल्या नोंदणीनुसार हा प्रकल्प पूर्ण करण्यास डिसेंबर २०२३ पर्यंतची मुदत आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी हे काम त्यापूर्वी पूर्ण करून घरे ताब्यात दिली जाणार आहेत. यापूर्वी मार्च, त्यानंतर १५ मे अशी मुदत दिली होती. मात्र, आता पत्रकार परिषदेमध्ये सुधारित मुदत प्रशासनाने जाहीर केली आहे. आयुक्त विक्रम कुमार म्‍हणाले, ‘‘पंतप्रधान आवास योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे, लवकरच हे काम पूर्ण होईल. शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, ‘‘खराडी आणि वडगाव खुर्द येथील आठ इमारतींपैकी सात इमारतींचे काम २० जूनपर्यंत पूर्ण होईल. तर हडपसर येथील काम ५ जुलैपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. नागरिकांना घरे ताब्यात देण्यासंदर्भात स्वतंत्रपणे तारीख जाहीर केली जाईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com