मंत्र्यांच्या जवळील दोघांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उछ्छाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्र्यांच्या जवळील दोघांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उछ्छाद
मंत्र्यांच्या जवळील दोघांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उछ्छाद

मंत्र्यांच्या जवळील दोघांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उछ्छाद

sakal_logo
By

जिल्हाधिकारी कार्यालयात
‘त्या दोघांचा‘ धुमाकूळ

कारभारातील हस्तक्षेपाने अधिकारी बेजार

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता, १ : मंत्री आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याची बतावणी करीत प्रशासनावर दबाव टाकून कामे करून घेणाऱ्या ‘त्या दोघांनी‘ दोघांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अँटी चेंबरमध्ये बसून ‘ते दोघे‘ हा कारभार करीत असल्यामुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
‘त्या दोघांचा‘ जिल्हा प्रशासनाच्या कारभारातील हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. येणारी प्रत्येक प्रकरणाची फाइल तपासणे, व्यक्तींची नावे घेणे, त्यांच्याशी थेट संपर्क साधणे, असे उद्योग ‘त्या दोघां‘कडून सुरू आहेत. एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने नकार दिल्यास त्यांना मंत्रालयातील ओळखपत्र दाखविले जाते. कधी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे खासगी सचिव असल्याचे सांगून कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जातो. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर त्यांनी जणू काही आपले कार्यालयच बनविले आहे.
प्राप्त माहितीनुसार वरिष्ठ अधिकारी आणि महसूल मंत्री यांचे जवळचे संबंध असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ‘ते दोघे‘ या साहेबांचे खासगी सचिव असल्याचे सांगत कामे करून घेत असल्याचे काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. अशाच एका प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी त्यांच्यातील एक जण पाचव्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावरील एका अधिकाऱ्याकडे गेला. ‘‘साहेबांनी अमुक एक फाइल मागविल्याचे’’ त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी ‘तुम्ही कोण’ अशी विचारणा त्याच्याकडे केल्यानंतर ‘‘साहेबांचा खासगी सचिव’’ असल्याचे त्याने सांगितले. खात्रीसाठी संबंधित अधिकाऱ्याने पाचव्या मजल्यावर चौकशी केल्यानंतर त्यांना हेच उत्तर त्यांना मिळाले. त्यामुळे ‘त्या दोघांना‘ कोणी आवर घालणार आहे की नाही, असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.
---

तक्रार कुठे, कशी करायची?

या प्रकाराची खात्री करण्यासाठी पत्रकारांनी गुरुवारी त्या कक्षाला भेट दिली असता त्यापैकी एकजण फायलींच्या गराड्यात असल्याचे दिसून आले. ‘ते दोघे‘ मंत्रालय, मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित असल्यामुळे कुणाकडे आणि कशी तक्रार करावी असा प्रश्न अधिकारी, कर्मचाऱ्यांना पडला आहे.
-----