आता पालकमंत्र्यांनी शब्द पाळावा ः सुप्रिया सुळे

आता पालकमंत्र्यांनी शब्द पाळावा ः सुप्रिया सुळे

Published on

पुणे, ता. ५ ः पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांतील नागरिकांकडून पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर कर आकारणी केली जाईल, या निर्णयाची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर करू, असे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. आता आचारसंहिता संपली आहे, पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. मी त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार यांना आठवण करून दिली.
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणी, कचरा, रस्ते, वाहतूक कोंडी या विषयावर सुळे यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दालनात बैठक घेतली. त्या वेळी नागरिकांनी आयुक्तांसमोर समस्या मांडल्या. त्यानंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके या वेळी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, ‘‘महापालिकेत नगरसेवक नसल्याने नागरिकांचे प्रश्‍न मांडण्यासाठी कोणीच नाही, त्यामुळे समस्या गंभीर होत आहेत. या गावांतील समस्यांवर मी दर महिन्याला बैठक घेऊन कामांचा पाठपुरावा करत आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामात महापालिका, राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्याने हे काम रखडले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्याचा पाठपुरावा सुरू आहे.’’
समाविष्ट गावांतील मिळकतधारकांना जास्त कर लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावांतील कर आकारणी पिंपरी-चिंचवडप्रमाणे करण्याचा निर्णय झाला आहे. पण त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. त्यासाठी नगरविकास विभागाकडेही पाठपुरावा करणार आहे. पालकमंत्र्यांनीही दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करावी.

तर पुण्याची स्थिती गंभीर
म्हाळुंगे, रावेत भागात ४० मजली इमारती उभ्या राहत आहेत. या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही. असे असताना प्रचंड वेगात बांधकामे होत आहेत. त्यामुळे पुण्याचे पाणी, कचरा, रस्ते याबाबत तज्ज्ञांकडून ऑडिट होणे आवश्‍यक आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.