Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

Loksabha Election 2024 : अचूक निकाल वर्तवा, २१ लाख जिंका!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य सांगून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे.

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य सांगून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली देखील महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही, तर ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.

जे ज्योतिषी या आव्हान प्रक्रियेत सहभागी होतील, त्यांना समितीमार्फत एक प्रश्नावली दिली जाईल. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये टी. शैलजा, नितीन गडकरी, राहुल गांधी, महुआ मल्होत्रा, कंगना राणावत यांना किती मते पडतील, तसेच कोलकता उत्तर, नालंदा, रायपूर, बारामती, आग्रा, बेल्लारी या मतदारसंघातून कोण विजयी होईल, वाराणसी, बुलडाणा, चांदणी चौक, लडाख, वेल्लोर, भुवनेश्वर या मतदारसंघात सर्वात कमी मते कोणाला पडतील, संपूर्ण भारतात सर्वांत कमी मते कोणत्या उमेदवाराला पडतील, कोणत्या मतदारसंघात नोटाला जास्त मतदान होईल, पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य किती उमेदवारांना मिळेल, आदी प्रश्नांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, विनोद वायंगणकर, प्रवीण देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. तसेच राजकीय भविष्य सांगण्यासाठी कोणती ज्योतिषपद्धत वापरली आहे, यांची माहिती ज्योतिषांनी देणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले.

आव्हान प्रक्रिया काय?
आव्हान प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवेशिका, उत्तरासहित अधिकृत प्रश्नावली आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र'' या नावे काढलेला रुपये पाच हजार रुपयांचा प्रवेश शुल्काचा धनाकर्ष (डी. डी.) सीलबंद पाकिटातून २५ मे २०२४ पर्यंत रजिस्टर पोस्टाने कार्तिक अपार्टमेंट, एफ-४, सहारा चौक, संजयनगर, सांगली- ४१६४१६. फोन नंबर - ०२३३-२३१२५१२ पत्त्यावर मिळणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर दोन आठवड्याच्या आत परीक्षक समितीच्या वतीने योग्य तो अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com