Pune Weather Update
Pune Weather UpdateSakal

Pune Weather Update : पुण्यात वाढला उन्हाचा चटका; उच्चांकी कमाल तापमानाची नोंद ३७.५ अंश सेल्सिअस

गेल्या वर्षी मार्चच्या पहिल्या २२ दिवसांमध्ये केवळ तीन दिवस ३५ पेक्षा जास्त अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यंदा १९ दिवस पुण्यात ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.

Pune Weather Update : शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाचा चटका जास्त जाणवत आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये ३५.७ अंश सेल्सिअस उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली होती. या वर्षी आतापर्यंत कमाल तापमानाच्या पाऱ्याने ३७.५ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली.

गेल्या वर्षी मार्चच्या पहिल्या २२ दिवसांमध्ये केवळ तीन दिवस ३५ पेक्षा जास्त अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यंदा १९ दिवस पुण्यात ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. शहरात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. गेल्या शनिवारी (ता. १६) शिवाजीनगरमधील वेधशाळेने कमाल तापमानाचा पारा ३५.४ अंश सेल्सिअस नोंदला होता. तो आता सरासरीपेक्षा १.३ अंश सेल्सिअसने वाढला.

रात्रीचा उकाडा वाढला :

शहरात गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा सातत्याने कमी होत होता. मंगळवारी (ता. १९) १६.१ अंश सेल्सिअस असलेला किमान तापमानाचा पारा बुधवारी (ता. २०) १४.९ आणि गुरुवारी (ता. २१) १४.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला.

मात्र शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत किमान तापमानाच्या पाऱ्याने गुरुवारच्या तुलनेत ४.३ अंश सेल्सिअसने उसळी मारली. तो सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने वाढून १८.५ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्यामुळे पहाटे जाणवणारा गारठा कमी होऊन रात्रीचा उकाडा वाढल्याचे पुणेकर सध्या अनुभवत आहेत.

उन्हाच्या झळा वाढल्या

शहर आणि परिसरात सकाळी दहापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. निरभ्र आकाश आणि हवेचा वेग मंद असल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. यामुळे दुपारी बारापासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी झाली. सायंकाळी पाचपर्यंत उन्हाचा चटका जाणवत आहे.

मालेगाव चाळिशी पार

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे नोंदले गेले. तेथे ४०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तेथील सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसने तापमान वाढले. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदण्यात आले, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

पुण्यातील हवामान

शहर आणि परिसरात पुढील चार दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा वाढून ३८ ते ३९ अंश सेल्सिअस नोंदला जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

शहर परिसरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पाषाण ............. ३७.४
शिवाजीनगर ....... ३७.५
लोहगाव ........... ३७.५
मगरपट्टा ......... ३८.१
लवळे ............ ३८.७

पुण्यातील मार्चमधील पाच वर्षांतील उच्चांकी तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
२९ मार्च २०२३ ......... ३५.७
३० मार्च २०२२ ......... ३९.५
२९ मार्च २०२१ ......... ३९.३
२४ मार्च २०२० ......... ३७.६
३० मार्च २०१९ ......... ४०.८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com