बीआरटी बसथांब्यावर समस्यांचा ‘प्रवास’

बीआरटी बसथांब्यावर समस्यांचा ‘प्रवास’

धनकवडी, ता. १८ : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गातील बसथांब्यांवरील स्वयंचलित दिव्याच्या यंत्रणेचा बोजवारा उडत असून, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यातच बीआरटी मार्गातून अन्य वाहनांचेही सर्रास वाहतूक सुरू असल्यामुळे मार्गात अपघातांचेही प्रमाण वाढू लागले आहे. बीआरटीचा थांबा आणि बसमध्ये जाण्याचे अंतर (लेव्हल बोर्डिंग) अधिक असल्याने प्रवासी घसरत आहेत. त्यामुळे महापालिकेने बीआरटी मार्गातील समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.
बीआरटी मार्गातील पद्मावतीसह भापकर पंप, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, मोरे बाग येथील बसथांब्यांतील स्वयंचलित दिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बीआरटी मार्गातील थांब्यांवर ‘लेव्हल बोर्डिंग’मध्ये फरक पडत असल्यामुळे बसमध्ये उतरताना व चढताना अपघात होण्याची शक्यता आहे. तर अंधाराचा फायदा घेऊन थांब्यांवर चोऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील मार्गासह बसथांब्यावर विजेची सोय करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. तसेच पूर्वी बीआरटी मार्गातून इतर वाहने जाऊ नये, म्हणून येथे बीआरटी प्रशासनाचे कर्मचारी उभे होते. मात्र, अनेक महिन्यापासून कोणताही कर्मचारी दिसून आला नाही. त्यामुळे बीआरटी मार्गातून इतर वाहने जाण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वाहनचालक बीआरटीलगत असलेल्या रस्त्यांच्या बाजूची वाहतूककोंडी टाळण्यासाठी जिवावर बेतेल, अशा पद्धतीने वाहने बीआरटीच्या मार्गातून जातात. स्वारगेट कात्रज बीआरटी मार्गात बस आणि थांब्याचा कठडा यात एक फुटापर्यंत अंतर राहत असल्याची बाब पाहणीत आढळून आली. त्यामुळे बसमध्ये चढ-उतार करताना प्रवाशांची गैरसोय होत असून, वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी भीतीदायक आहे. बीआरटी मार्गातून खासगी वाहने जाऊ नयेत, यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी वॉर्डन नियुक्त केले होते. परंतु, त्यांचे मासिक वेतन थकल्याने ठेकेदारांनी ते काढून घेतले आहेत. परंतु, पालिकेने याबाबत पुन्हा कार्यवाही केलेली नसल्याने खासगी वाहने बीआरटी मार्गातून सुसाट आहेत.

स्वारगेट बीआरटी मार्ग अंतर ः ६ किलोमीटर
बीआरटी मार्गावरील बसच्या फेऱ्या ः २०२४९
मार्गांची संख्या ः ४५
थांब्याची संख्या ः १०

बीआरटी मार्गातील त्रुटी...
बस फ्लोअर-प्लॅटफॉर्ममध्ये एक फुटापर्यंत अंतर राहते आहे.
बसच्या दारात अगदी पुढे उभे राहणाऱ्या प्रवाशाला दार उघडताना लागल्याचा प्रकार घडला.
बस ''फ्लोअर'' आणि ''प्लॅटफॉर्म'' यात बरेचसे अंतर राहत असल्याचे प्रवाशांना चढ-उतार करताना काळजी घ्यावी लागत आहे.
बसथांब्यावर साठलेला कचरा
बसथांब्यावर अनधिकृत पार्किंग
मार्गदर्शक फलक खराब झाले आहेत
खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्याकडे दुर्लक्ष

अपघाताची आकडेवारी...
एप्रिल २०१९ ते मार्च २०२३ दरम्यान
प्राणांतिक अपघात संख्या : १०
प्राणांतिक अपघातामधील मृत्यू व्यक्ती : १०
गंभीर जखमी अपघात संख्या : २४
गंभीर जखमी व्यक्ती : २३
किरकोळ अपघात : ५
किरकोळ जखमी व्यक्ती : १३
अपघात संख्या : ४६
एकूण अपघातग्रस्त व्यक्ती : ४६

बीआरटी मार्गातील अनधिकृत वाहन प्रवेशावर कारवाईबाबत पोलिस शाखेला वेळोवेळी विनंती पत्र दिले. तसेच बीआरटी मार्गातील बसथांब्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे असून, विद्युत विषयक दुरुस्ती कामे सुरु आहे. तसेच थांब्यांचे नुकसान होत असल्याबाबत पोलिसांशी संपर्क साधून, पीएमपीएल कारवाई करीत आहे. तसेच बीआरटी मार्गाबद्दल
नागरिकांत जागरूकताही करण्यात येत आहे.
अनंत वाघमारे, बीआरटी प्रमुख, पीएमपी.

बीआरटी मार्गातील थांब्यात बऱ्याचदा दिवे बंद असतात. दुरुस्तीनंतरही बसथांब्यावरील दिवे बंद का होतात? बसथांब्यावरील स्वयंचलित दिव्यांच्या यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीकडे पीएमपीच्या प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेकडो बसेस या मार्गावरुन जातात पण महापालिका अधिकारी आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही.
आदिती सारोळे, प्रवासी धनकवडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com