मायणी : ग्राम पेरू

मायणी : ग्राम पेरू
Published on

(एका पानाचा लेख)

राज्यभर पोचलेला
पांढऱ्या मातीतील पेरू
-----------

मायणी परिसरातील पांढरी, कसदार माती आणि परतीच्या पावसाला पोषक हवामान यामुळे येथील गोडसर पेरूने राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, योग्य माती आणि शास्त्रीय लागवड पद्धतीमुळे या भागात पेरूची लागवड वाढत असून, अनेक शेतकऱ्यांसाठी ती फायदेशीर ठरत आहे.

------------
मायणीच्या पांढऱ्या मातीतील गाभेदार गोडसर पेरू राज्यभर प्रसिद्ध आहे. परतीच्या मॉन्सूनवर अवलंबून असणाऱ्या या भागात गणपतीनंतरच मोठा पाऊस सुरू होतो. कमी पावसाचा भाग असून, येथे पांढरी, मुरमाड व तांबडी माती आहे. आधुनिक तंत्राने शेती करणारे शेतकरी अलीकडे मोठ्या प्रमाणात पेरूच्या बागा लावतात. त्याचेही रहस्य येथील हवामानात आहे. पेरूच्या बागांसाठी पांढरी माती उत्तम आहे. कारण या मातीत क्षारांचे योग्य प्रमाण असणारा कसदारपणाही आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पानगळती होते; पण फळभार दुणावतो. झाडाचे अस्सल सत्त्व फळात उतरते. म्हणूनच मायणीसारखे चविष्ट पेरू अन्यत्र मिळत नाहीत, असा अनेकांचा अनुभव आहे.
अलीकडेच्या दशकात गावातील लोक ग्रामीण जीवनाकडून शहरी जीवनाकडे वळत आहेत. येथे झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक बदलामुळे शेती व्यवसायही बदलला आहे. कमी पाण्यावर चालणारी शेतीही येथे केली जाते. त्यात डाळिंब, द्राक्षे व पेरू बागांचा समावेश आहे. गावातील विशेषतः माळी समाज खोबऱ्याच्या चवीच्या पेरूचे बागेत उत्पादन घेतो. शेतीच्या पाणी समस्येमुळे अनेक बागायतदारांनी पेरूच्या बागा काढून टाकल्या. मात्र, अलीकडे शेतीतील नव्या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यावर व पांढरी मातीच्या गुणधर्मांमुळे मायणीचा पेरू राज्यात पुन्हा नावारूपाला आला आहे. येथील गोड पेरू स्थानिक व्यापारी कोकणात विक्रीस घेऊन जातात. मायणीच्या चांदणी चौकात कायम पेरूविक्रेते व ग्राहकांची रेलचेल पाहावयास मिळते.
मायणीच्या पेरूच्या बागेत सरदार, लखनौ, जयविलास, लाल पेरू, पुणेरी, देशी, थायलंड आदी प्रजातीचे उत्पन्न घेतले जाते. बागेत झाडाला गोल आळे करून पांढरी माती टाकल्याने पेरूची चव, रंग, चकाकी व पेरू जास्त टिकून राहतो. त्यामुळे मायणीच्या पेरूची चव राज्यभर पसरली आहे. या बागांना बहाराची फुले ही ऑगस्ट व जूनमध्ये येतात. मात्र, अलीकडे वर्षभर पेरूंचे उत्पादन घेतले जाते. येथील पेरूला कोकणात रत्नागिरी, सांगली, मालवण, सिंधुदुर्ग, पाटण, पुणे, कऱ्हाड, विटा, वडूज आदी ठिकाणी अधिक मागणी असते. गावातील वाहिद बागवान, संतोष माने, सुरेश माने, मधुकर कचरे, भिकू माळी, बजरंग थोरात, समीर बागवान, संजय गुदगे, अमित माने, आबासाहेब माने, हारूण बागवान, मेहमूद बागवान, दिनकर थोरात, मोहन माळी, धनाजी माळी, अरुण माळी, उमेश माळी, मोहन माळी, हसन बागवान, हमीद बागवान, गणी बागवान, पंढरीनाथ माने, नागेश यादव आदी पेरू उत्पादनांसाठी नावाजलेले आहेत.

कोट :
अलीकडे पांढऱ्या मातीबरोबरच रासायनिक खताचा वापर करून वर्षभर पेरू घेतला जातो. मात्र, उन्हाळ्यात घेतलेल्या पेरूत कमी गर व बिया अधिक येतात. त्यामुळे फळ चव देत नाही. पारंपरिक पद्धतीने झाडाला घातलेल्या पांढऱ्या मातीमुळे मायणीच्या पेरूची आजही राज्यभर चव टिकून आहे.
- उमेश माळी, पेरू उत्पादक

----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com