नववीतील मुलीचा बालविवाह रोखला

नववीतील मुलीचा बालविवाह रोखला

वडगाव शेरी, ता ४ : विद्येच्या माहेरघरात शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोहगाव येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या जागरुकतेमुळे रोखला गेला. बालकल्याण समिती आणि विमानतळ पोलिसांना बालविवाह रोखण्यात यश आले. संबंधित मुलगी इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे.
याबाबत बालकल्याण समिती सदस्य आनंद शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा गादिया यांनी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर यांना दूरध्वनी करून लोहगाव येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेवरून बालकल्याण समिती सदस्य वैशाली गायकवाड, आनंद शिंदे, श्यामलता राव, पूर्वी जाधव यांनी विमानतळ पोलिसांशी संपर्क साधला.
हा बालविवाह नियोजित असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवदास लहाने यांनी तत्परता दाखवीत जागेवर जाऊन हा बालविवाह रोखला.
सोंडे म्हणाले, संबंधित मुलीस ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले आहे. तसेच मुलीच्या पालकांनाही नोटीस दिली आहे.
बाल कल्याण समिती सदस्य आनंद शिंदे म्हणाले, ‘‘समितीने मुलीस तात्पुरते संस्थेत ठेवण्याचे आदेश देऊन तिला सुरक्षित केले आहे. संबंधित मुलीच्या आई-वडिलांचे समुपदेशन करणार आहे. समाजानेही जागरूक राहून असे बालविवाह रोखावेत.’’

कायदा असूनही समाजात आजही बालविवाह होतात, हे खरंतर दुर्दैवच म्हणावे लागेल. अशा घटना थांबवण्यासाठी शाळा, वस्ती आणि गावागावांत प्रभावीपणे जनजागृती करावी लागेल. तेव्हाच बालविवाहाला बळी पडणाऱ्या मुली न घाबरता समोर येऊन विरोध करतील.
- पोर्णिमा गादिया, समाजसेविका


तुमचे मत सांगा...
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात अन् ते ही २१ व्या शतकात बालविवाहासारखे प्रकार घडत आहेत. याबाबत सरकार व सामाजिक संस्थांनी कोणती पावले उचलणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com