टिंबर मार्केटमधील सात गोदामे खाक

टिंबर मार्केटमधील सात गोदामे खाक

पुणे/कॅन्टोन्मेंट, ता. २५ : भवानी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये रामोशी गेटजवळ गुरुवारी (ता. २५) पहाटे साडेतीन वाजता लागलेल्या भीषण आगीत लाकडांनी भरलेली सात गोदामे खाक झाली. पुणे महापालिका, कॅन्टोमेंट, पीएमआरडीए आणि पिंपरी चिंचवड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सकाळी साडेदहाच्या सुमारास आग आटोक्यात आणली. यात कोणीही जखमी किंवा जीवित हानी झालेली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.
टिंबर मार्केटमध्ये रामोशी गेटजवळ गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता गोदामांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यावर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतु आगीने रौद्र रूप धारण केले होते. शेजारील शाळा आणि काही घरांनाही आगीची झळ बसली. वस्तीमध्ये आग पसरू नये, यासाठी जवानांनी तत्काळ गोदामाशेजारी असलेल्या घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढली. त्यामुळे मोठा धोका टळला. या आगीत सात गोदाम आणि आठ घरे खाक झाली. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह २० अधिकारी आणि सुमारे १०० जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

आगीत झालेले नुकसान
या आगीमध्ये मधुर ट्रेडर्स- राहुल संघवी, वर्धमान एंटरप्रायझेस- प्रकाश मुथा, नतमल मुलाजी ओसवाल, अशोक ओसवाल, नॅशनल टिंबर- नालचन ओसवाल, मनोज टिंबर्स- बाळासाहेब ओसवाल, गुलाब टिंबर्स- गुलाब ओसवाल यांची लाकडाची गोदामे खाक झाली. तसेच संतोष गायकवाड, हेमंत साबळे, रवी लडकत, दिलीप पांडे, दिनेश शेठ, सुदेश लडकत, गणेश लोणकर, विजू लडकत आदींच्या घरांचे नुकसान झाले. क्रिस्टल कर्विल अँड इंजिनिअरिंगचे कटिंग मशिन जळून खाक झाल्याचे व्यापारी आदित्य आहेर यांनी सांगितले.

शाळेतील खोल्यांचे नुकसान
महापालिकेच्या रफी अहमद किडवाई उर्दू शाळेतील आठ-दहा खोल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. शाळेच्या कार्यालयातील साहित्यही जळून खाक झाले. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

टिंबर मार्केटमधून सरकारला महसूल मिळतो. परंतु सोयी-सुविधा मिळत नाहीत. अशा घटनेत व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. गुरुवार असल्याने पाणी नाही, पाण्याचा दाब कमी असल्याने आग नियंत्रणात आणण्यात अडचण आली. टिंबर मार्केटसाठी अतिरिक्त जागेची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. परंतु ही समस्या अद्याप सुटलेली नाही.
- रतनशेठ किराड,
अध्यक्ष, टिंबर मार्केट असोसिएशन

मित्रांनी आग लागल्याचे सांगत बाहेरून दरवाजा वाजवून आवाज दिला. त्यानंतर आम्ही घराबाहेर पडलो. परंतु आगीत घरातील कपाट, टिव्ही, सोफा, फ्रिज आणि इतर संसारोपयोगी साहित्य खाक झाले. सरकारने नुकसानभरपाई द्यावी.
- संतोष गायकवाड, स्थानिक रहिवासी

टिंबर मार्केटमध्ये तिसऱ्यांदा आगीची घटना घडली. आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात सर्वांचेच हातावर पोट आहे. या भागात पुन्हा आगीची घटना होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. सरकारने आम्हाला भरपाई द्यावी.
- शीतल लडकत, स्थानिक रहिवासी

या जागेतील रहिवासी परिसरास व्यावसायिक स्वरूप दिले आहे. अनेकांनी राहती घरे दुकानदारांना विकली. या व्यवसायामुळे अनेकदा आग लागण्याची दुर्घटना घडते. त्यामुळे येथील लाकडाची गोदामे आणि दुकाने बंद करावीत.
- विजय निकम, स्थानिक रहिवासी

दररोज रात्री वाहनांच्या आडोशाला बसून मद्यपी व्यसन करतात. टिंबर मार्केटला काही सुविधा दिलेल्या नाहीत. टिंबर मार्केटबाबत गांभीर्य नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत.
- राकेश ओसवाल, व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com