प्रस्ताव दिल्यास बाजारात शौचालय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

आंबेठाण - पाईट, कुरकुंडी आणि भांबोली (ता. खेड) येथील आठवडे बाजारात सार्वजनिक शौचालये उभारण्याचा प्रस्ताव आल्यास ते बांधून दिले जाईल. तीर्थक्षेत्र तोरणे येथे पालखीमार्ग आणि वाहनतळ उभारणार आहे. पाणंद रस्त्यासाठी जिल्हा परिषदेची योजना असून, त्याचा प्रस्ताव आल्यास तत्काळ निधी दिला जाईल. समन्वयासाठी ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली. 

पिंपरी बुद्रुक-पाईट जिल्हा परिषद गटातील सरपंच, ग्रामसेवक आणि विविध खात्यांचे अधिकारी यांची सहविचार सभा, तसेच २०१८-१९ मध्ये अंमलबजावणी करावयाच्या कामांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यासाठी आंबेठाण (ता. खेड) येथे सभा झाली. त्यात बुट्टे पाटील बोलत होते.

या वेळी पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, आंबेठाणचे सरपंच दत्तात्रेय मांडेकर, संजय रौंधळ, शाखा अभियंता एस. एम. भिंगे, बी. एम. वाघमारे यांच्यासह विविध गावचे सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

बुट्टे पाटील म्हणाले, की बिरदवडीसाठी एक घंटागाडी देणार असून एक गाडी ग्रामपंचायतीने उपलब्ध करावी. पिंपरी बुद्रुकनंतर या वर्षी पाईट गाव शंभर टक्के काँक्रिटीकरण करणार आहे. तसेच, कोरेगाव बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी देणार आहे. धामणे गावासाठी हायमास्ट दिवा, तर रोहकलच्या तीनही ठाकरवाड्यांसाठी सिमेंट रस्ते बनविण्यासाठी प्रस्ताव आल्यास निधी देऊ. 

नव्याने नियुक्त झालेले विस्तार अधिकारी एस. डी. थोरात आणि ग्रामसेवकांचे या वेळी स्वागत करण्यात आले. सरपंच मांडेकर यांनी स्वागत करून आभार मानले.

Web Title: Toilets in the market if offered