टोमॅटो खरेदीकडे व्यापाऱ्यांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नारायणगाव - भाजीपाल्याच्या घटलेल्या बाजारभावामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला असतानाच डिझेल व पेट्रोलच्या भाववाढीमुळे मशागतीचा व वाहतुकीचा खर्च वाढल्याने त्याच्या अडचणीत भर पडली आहे. डिझेल भाववाढीचा थेट परिणाम गुरुवारी (ता. २४) येथील टोमॅटो उपबाजारात दिसून आला. वाहतुकीचा खर्च वाढल्याने परराज्यातील व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवली. 

गेल्या वर्षभरात पेट्रोल व डिझेलची सातत्याने भाव वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत डिझेल व पेट्रोलच्या भावात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. मात्र, भाजीपाला पिकांचे बाजारभाव पडले आहेत. शेतकऱ्यांचे अर्थकारण यामुळे बिघडले आहे.

टोमॅटो उपबाजारात गुरुवारी (ता. २४) सुमारे चाळीस हजार क्रेटची आवक झाली. क्रेटला प्रतवारीनुसार पन्नास रुपये ते शंभर रुपयांच्यादरम्यान भाव मिळाला. डिझेल भाववाढीमुळे प्रतिकेट वाहतूक खर्चात दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात उत्तरेकडील राज्यात टोमॅटो पाठविला जातो; परंतु वाहतुकीचा खर्च ३० वरून ४० हजारावर गेल्याने अनेक व्यापाऱ्यांनी टोमॅटोची खरेदी थांबविला. 

व्यापारीही अडचणीत
टोमॅटो व्यापारी जालिंदर थोरवे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना एका क्रेटसाठी वाहतूक भाडे अंतरानुसार वीस ते चाळीस रुपये द्यावे लागते. डिझेल भाववाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांबरोबरच व्यापारीसुद्धा अडचणीत सापडले आहेत.’’

आंदोलनाचा इशारा
डिझेल व पेट्रोल भाववाढीच्या निषेधार्थ शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने जुन्नर तालुक्‍यात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी दिला आहे.

वीस रुपयांत खर्च कसा भागवायचा?
बदगी बेलापूर (ता. अकोला) येथील शेतकरी संतोष फापाळे म्हणाले, ‘‘उपबाजारात दीडशे क्रेट विक्रीसाठी आणले होते. तोडणी मजुरी, पॅकिंग, वाहतूक आदींसाठी एका क्रेटला साठ रुपये खर्च झाला. क्रेटला ऐंशी रुपये भाव मिळाला. शिल्लक वीस रुपयांत बियाणे, मशागत, वीजबिलाचा खर्च कसा वसूल होणार?’’

Web Title: tomato purchasing businessman