crime_logo
crime_logo

दौंड रेल्वे स्थानकावर तीन महिलांसह एकूण १९ प्रवाशांना बेदम मारहाण

दौंड (पुणे) - दौंड रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ घेण्यास उतरलेल्या तीन महिलांसह एकूण १९ प्रवाशांना क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण व चाकूने जखमा करणाऱ्या १५ विक्रेत्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही लोहमार्ग पोलिस कारवाई करण्यास कचरत आहेत. 

दौंड रेल्वे पोलिस ठाण्याचे अंमलदार दत्तात्रेय खोत यांनी या बाबत माहिती दिली. गफार शेख (रा. पुणे) हे आपल्या एकूण १९ नातेवाईकांसह २७ फेब्रुवारी रोजी बिजापूर - मुंबई फास्ट पॅसेंजरने बिजापूर ते पुणे असा प्रवास करीत होते. सदर पॅसेंजर रात्री दहा वाजता दौंड रेल्वे स्थानकावर आली असता गफार शेख यांनी फलाट क्रमांक तीन वरील मेसर्स वाय. आर. खान कॅन्टीनमध्ये जाऊन गरम समोशांची विचारणा केली. संबंधित विक्रेत्याने समोसे ताजे व गरम असल्याचे सांगितले. परंतु, गफार शेख यांनी हात लावले असता ते थंड असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी घेण्यास नकार दिला. त्यावरून विक्रेत्याने समोसे घ्यायचे नव्हते तर हात का लावला ? असे उद्दामपणे म्हणत गफार शेख यांना धक्का देत दमदाटी केली. दरम्यान सदर मारहाण पाहून गफार शेख यांचे नातेवाईक कॅन्टीन मध्ये आले असता विक्रेत्याने त्यांची कॅालर पकडून शिवीगाळ केली आणि कॅन्टीन मधील अन्य कर्मचारी व विक्रेते असे एकूण १५ ते २० जणांनी हातातील स्टीलचे पाइप, कांदा कापायचा चाकू व दांडक्याने शेख यांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. मारहाणीत इम्रान कासम शेख (वय २५) व इरफान शौकत सय्यद (वय ३०) यांच्या उजव्या मनगटास जखम झाली आहे. मारहाण करणार्यांमध्ये रेल्वे स्थानकावर अनधिकृतपणे चहा व पुलाव विक्री करणार्यांचा समावेश होता, असे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान रामबरण भदोरिया (रा. दौंड) या विक्रेत्याने गफार शेख व सहकार्यांनी खाद्यपदार्थ फुकट खाण्याच्या उद्देशाने मारहाण करीत दहा हजार रूपयांचे नुकसान केल्याची फिर्याद दाखल केली आहे.

लोहमार्ग पोलिसांची संशयास्पद भूमिका
रेल्वे स्थानकावर १५ ते २० विक्रेते प्रवाशांना बेदम मारहाण करीत असताना कर्तव्यावरील लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. महिलांना माराहण होण्यासह प्रवासी जखमी झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतरही लोहमार्ग पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेपर्यंत संबंधित विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com