पर्यटकांना आंदर मावळ धबधब्याची भुरळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

निसर्ग सौंदर्याने नटलेले आंदर मावळ पर्यटकांना आकर्षित करीत आहे. धबधब्याखाली चिंब भिजण्यासाठी आणि वर्षाविहारासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. 

टाकवे बुद्रुक - निसर्ग सौंदर्याने नटलेले आंदर मावळ पर्यटकांना आकर्षित करीत आहे. धबधब्याखाली चिंब भिजण्यासाठी आणि वर्षाविहारासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांसाठी अस्सल मावळी थाटातील घरगुती पद्धतीचे जेवण, गरमागरम चहा, वडापाव, वाफळलेल्या शेंगा, मक्याचे कणीस, चायनीज सेंटर पर्यटकांच्या स्वागताला सजली आहे. खेडोपाडी धबधब्याच्या लगत अनेक लहान मोठ्या हातगाड्या लावुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. 

पुणे-मुंबई महामार्गावरून कान्हे फाटयातील रेल्वे फाटक ओलांडून पुढे गेले की इंद्रायणी नदी वाहते. फळणे फाटयावरून डावीकडे खांडीला आणि उजवीकडे सावळ्याला जाणारा मार्ग पर्यटकांना घेऊन पुढे जात आहे. माऊ, गभालेवाडी, वडेश्वर, शिदेवाडी, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहूली, लालवाडी, बेंदेवाडी, कुसूर, खांडी ला धबधबे आणि हिरवीगार वनराई न्याहाळत जाता येते, तसेच भोयरे मार्गे जाताना कोंडिवडे जवळील आंद्रा नदीचे पात्र पाहून पुढे कल्हाट, कशाळ, किवळे, पारीठेवाडी, इंगळूण, मानकुली, कुणे, अनसुटे, माळेगाव खुर्द व बुद्रुक, पिंपरी, तळपेवाडी, सावळा आणि वाड्या वस्त्याच्या लगतचे धबधबे पाहता येतात. खांडीच्या पुढे चार किलोमीटर अंतरावर टाटा पाॅवरचा वीजनिर्मिती प्रकल्पासह कर्जत तालुक्यातील विहंगम दृश्य पाहता येते. नागमोडी वळणाचा रस्ता असल्याने वाहने चालवताना काळजी घ्यावी, कुटूंबासमवेत वनडे ट्रीपसाठी उत्तम पर्याय आहे. सध्या भात लावणी असल्याने पारंपरिक शेतीची लावणी, बैलजोडी कडून चिखलणी मुलांना दाखवत, काळया मातीशी नातं किती घट्ट ठेवता येते हे दाखवता येईल. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 

Web Title: tourists like Andar Maval waterfall at takve budruk pune