esakal | पुण्यातील वडगाव शेरी, विमाननगरमध्ये दुकाने उघडीच, व्यापाऱ्यांचा विरोध

बोलून बातमी शोधा

vadgaon sheri

नगर रस्त्यावर विमाननगर, वडगाव शेरी खराडी, चंदननगर परिसरात मंगळवारी लॉकडाऊनचा फज्जा उडाला.

पुण्यातील वडगाव शेरी, विमाननगरमध्ये दुकाने उघडीच, व्यापाऱ्यांचा विरोध
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वडगाव शेरी : नगर रस्त्यावर विमाननगर, वडगाव शेरी खराडी, चंदननगर परिसरात मंगळवारी लॉकडाऊनचा फज्जा उडाला. शासन आदेश मोडून मंगळवारी दुपारपर्यंत या भागातील बहुतांशी दुकाने सुरु होती. नियम तोडून सुरू ठेवलेल्या दुकानांचे समर्थन व्यापारी करीत असल्याचे दिसले. तर काही व्यापाऱ्यांमध्ये नियमावली बाबत संभ्रम असल्याचे दिसले. लॉकडाऊनचा निर्णय शासनाने न बदलल्यास आमच्यावर भीक मागण्याची वेळ येईल; अशी भावना या भागातील व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. पहिल्या लॉकडाऊन प्रमाणे यावेळी पुणे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीसांनी दुकाने बंद करण्यासाठी आग्रही भूमिका न घेतल्यामुळे दुकानदारांनी दुपारपर्यंत दुकाने सुरुच ठेवली. मंगळवारी सकाळपासूनच बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. हार्डवेअर, स्टेशनरी, झेरोक्स, कपडे, खेळणी, सिगरेट, पान,  तंबाखू, गाडी दुरुस्तीची दुकाने, आइस्क्रीमच्या गाड्या सुरू असल्याचे दिसले. यासोबत इतर सर्व अत्यावश्यक सेवेतील किराणामालाची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, पार्सल सेवा देणारे हॉटेल, चहा वडापाव दुकाने,  सुरू असल्याचे दिसले. मॉल, दारू दुकाने आणि सलून बंद होते.

हेही वाचा - आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची सोडत बुधवारी होणार जाहीर
विमाननगर येथील साकोरेनगरमध्ये सोमवारी उशिरा मध्यरात्रीपर्यंत ग्राहकांना हॉटेलमधून खाद्यपदार्थ बनवून देण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. येथील काही हॉटेल चालक दुप्पट दराने पाणी विक्री आणि थंडपेय याची विक्री करीत होते. चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव म्हणाले, दुकाने बंद ठेवायची की नाहीत याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असल्यामुळे हा प्रकार घडला. परंतु मंगळवारी दुपारनंतर मात्र पोलिसांनी संपूर्ण परिसरात फिरून जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन केले. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. विमानतळ पोलीस निरीक्षक गजानन पवार म्हणाले, राज्य शासनाच्या आणि पुणे महानगरपालिकेच्या दोन स्वतंत्र आदेशांमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. लॉकडाऊन बाबत व्यापाऱ्यांना सूचना देण्याचे काम आणि अंमलबजावणीचे काम पोलीस करीत आहेत. तरीही काही दुकाने सुरू असतील तर माहिती घेतो.

हेही वाचा - पुणे विद्यापीठातील विशेष प्राध्यापकांची नियुक्ती रद्द करा; कुलगुरूंकडे मागणी

याविषयी चंदननगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष परेश कटारिया म्हणाले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने मी शासनाने दिलेले नियम पाळण्याचे आवाहन सर्व व्यापाऱ्यांना केले आहे. परंतु आमचीही बाजू शासनाने ऐकावी. दुकानाचे भाडे, मुलांच्या शाळेच्या फी, नोकरांचे पगार, लाईट बिल, कर्जाचे हप्ते आम्ही कसे फेडणार. याकरताच काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली असावीत. कारण शासनाने कोणतीही सवलत दिलेली नाही. हा लॉकडाऊन आमच्या माथी मारला आहे. हे असेच सुरू राहिल्यास कोरोना ऐवजी व्यापारी कर्जबाजारी होऊन मरतील. शासनाने लॉकडाऊनचा निर्णय मागे न घेतल्यास आम्हाला भीक मागो आंदोलन करावे लागेल.