'फ्लेक्‍स'मुळे झाकोळतोय दुकानदारांचा व्यवसाय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

पुणे : माझे घोरपडे पेठेत दुकान आहे. या दुकानासमोर फ्लेक्‍स लावण्यात येत असल्याने दुकानाचा दर्शनी भाग ग्राहकांना दिसत नाही. फ्लेक्‍सच्या विरोधात मी उपोषणही केले. महापालिका दखल घेत नाही..., गिरीश कदम भावना व्यक्त करीत होते. कदम यांच्याप्रमाणेच शहरातील अनेक व्यावसायिकांची ही अवस्था झाली आहे. 'फ्लेक्‍सबाजी'मुळे शहरातील अनेक दुकानांच्या पाट्याच नव्हे तर निम्मे दुकान झाकले जात आहे. 

पुणे : माझे घोरपडे पेठेत दुकान आहे. या दुकानासमोर फ्लेक्‍स लावण्यात येत असल्याने दुकानाचा दर्शनी भाग ग्राहकांना दिसत नाही. फ्लेक्‍सच्या विरोधात मी उपोषणही केले. महापालिका दखल घेत नाही..., गिरीश कदम भावना व्यक्त करीत होते. कदम यांच्याप्रमाणेच शहरातील अनेक व्यावसायिकांची ही अवस्था झाली आहे. 'फ्लेक्‍सबाजी'मुळे शहरातील अनेक दुकानांच्या पाट्याच नव्हे तर निम्मे दुकान झाकले जात आहे. 

विविध राजकीय पक्ष, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था, विविध गणेश मंडळे यांच्याकडून अनधिकृत 'फ्लेक्‍स' लावले जातात. हे 'फ्लेक्‍स' सतत लावल्याने काही जागा 'फ्लेक्‍स' लावण्यासाठीच 'फिक्‍स' होत आहेत. त्याचा फटका तेथील व्यावसायिकांना बसत आहे.

घोरपडे पेठेतील कदम हे खानावळ चालवितात. त्यांच्या दुकानासमोर लावण्यात येणाऱ्या 'फ्लेक्‍स'च्याविरोधात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्यांनी लाक्षणिक उपोषण केले. महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त कार्यालयात त्यांनी वेळोवेळी निवेदनेही दिली; परंतु कारवाई केली गेली नाही. 'फ्लेक्‍स'मुळे त्यांचे दुकान, पाटी झाकली जाते. त्यामुळे व्यवसाय कसा करायचा असा प्रश्‍न कदम यांनी उपस्थित केला आहे. 

शहरातील महत्त्वाच्या चौकात हेच चित्र दिसत आहे. महापालिका इमारतीसमोरच लावल्या जाणाऱ्या 'फ्लेक्‍स'मुळे तेथील दुकाने पूर्णपणे झाकली जातात. एक दोन दिवस 'फ्लेक्‍स' लावला तर ठीक पण एक व्यक्ती (लोकप्रतिनिधी), संस्था, संघटनेचा 'फ्लेक्‍स' काढला गेला की दुसरा 'फ्लेक्‍स' लावला जातो. या 'फ्लेक्‍सबाजी'मुळे व्यावसायिकांसमोरील अडचण कायमच राहते. परिणामी, व्यवसाय करणे अवघड झाले आहे. महापालिकेने ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. 

न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिकेकडून अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई केली जाते. गुन्हेही दाखल केले जातात. न्यायालयाच्या निर्णयानुसार संबंधित नागरिकही अनधिकृत फ्लेक्‍स उभारणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देऊ शकतो. 
- तुषार दौंडकर, उपायुक्त, परवाना व आकाशचिन्ह विभाग 

गेल्या पंधरा महिन्यांतील महापालिकेची कारवाई 

  • दाखल गुन्हे - 79 
  • फ्लेक्‍स - 24 हजार 992 
  • जाहिरात फलक - 241 
  • बॅनर - 61 हजार 235 
  • पोस्टर - 1 लाख 18 हजार 899 

अशी लावली जाते विल्हेवाट 
महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागातर्फे अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनर आदींवर कारवाई केल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. फलक, फ्लेक्‍ससाठी वापरण्यात येणारे लोखंड, 'फ्लेक्‍स'चे कापड लिलाव करून विकले जाते. लाकूड हे महापालिकेच्या कर्मशाळेत वापरण्यासाठी दिले जाते.

Web Title: Traders in Pune complaints about illegal flex hampering their business