वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवा रस्ता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

रेल्वे स्थानकात थेट प्रवेश; पंधरा दिवसांत कामाला सुरवात
पुणे - पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चौकातून थेट रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पंधरा दिवसांत या रस्त्याच्या कामास सुरवात होणार आहे.

रेल्वे स्थानकात थेट प्रवेश; पंधरा दिवसांत कामाला सुरवात
पुणे - पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चौकातून थेट रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पंधरा दिवसांत या रस्त्याच्या कामास सुरवात होणार आहे.

पीएमपीएल, एसटी आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या स्टेशनवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांमुळे पुणे रेल्वे स्थानक चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या चौकातून रेल्वे स्थानकाकडे जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यातच रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करण्यासाठी येणाऱ्या वाहनांना सध्या रस्त्यावरून नव्वद अंशाच्या कोनात वळावे लागते. त्यामुळे अनेकदा या मार्गावरही वाहतूक कोंडी होते. या सर्व समस्यांमुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे स्थानक चौकातून थेट रेल्वे स्थानकात प्रवेश करता यावा, यासाठी नवीन मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी सध्या रेल्वे स्थानकात असणाऱ्या रिक्षा स्टॅंडचे स्थलांतर करण्यात येणार आहे. हे रिक्षा स्टॅंड रेल्वे स्थानकातील दत्त मंदिराच्या मागील बाजूस म्हणजेच जुन्या दुचाकी वाहनतळाच्या जागेवर स्थलांतरित करण्यात येणार आहे. स्थलांतरित रिक्षा स्टॅंडचे काम पूर्ण होत आले असून, येत्या पंधरा दिवसांत रिक्षा स्टॅंड नवीन जागेत हलविण्यात येईल. त्यानंतर रस्त्याच्या कामास सुरवात होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक कृष्णा पाटील यांनी दिली. हा रस्ता तयार झाल्यानंतर रेल्वे स्थानकात विनाअडथळा ये-जा करता येईल, असेही ते म्हणाले.

- पुणे रेल्वे स्थानक चौकातील कोंडी फोडण्यासाठी नवीन रस्ता
- वाहनांना चौकातून थेट रेल्वे स्थानकात प्रवेश
- पंधरा दिवसांत नवीन रस्त्याच्या कामास सुरवात

Web Title: Traffic congestion break new road