वाहतूक कोंडीमधून वाघोलीकरांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

वाघोली - आव्हाळवाडी चौक ते केसनंद फाटा चौकादरम्यानच्या रस्त्यावर ग्रामपंचायतीने मंगळवारी रात्री खडी टाकली. यामुळे अधिकची दीड लेन वाहतुकीसाठी खुली झाल्याने बुधवारी वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला. परिसरातील वाहतुकीच्या समस्येबाबत पाठपुरवठा केल्याबद्दल नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले.

वाघोली - आव्हाळवाडी चौक ते केसनंद फाटा चौकादरम्यानच्या रस्त्यावर ग्रामपंचायतीने मंगळवारी रात्री खडी टाकली. यामुळे अधिकची दीड लेन वाहतुकीसाठी खुली झाल्याने बुधवारी वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला. परिसरातील वाहतुकीच्या समस्येबाबत पाठपुरवठा केल्याबद्दल नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले.

या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते. आव्हाळवाडी चौक ते केसनंद फाटा चौकादरम्यान अनेक खड्डे होते. तसेच, अनेक ठिकाणी पाणी साचत होते. यामुळे वाहतुकीसाठी दोनच लेन उपलब्ध होत्या. त्यातच सेवा रस्त्यावर पार्क होणारी वाहने, बेशिस्त वाहतूक यामुळे सततची कोंडी होत होती. ग्रामपंचायतीने या रस्त्यावर खडी टाकल्याने बुधवारी अधिक दीड लेन वाहतुकीसाठी उपलब्ध झाली. यामुळे बुधवारी वाहतूक कोंडीतून चांगलाच दिलासा मिळाला. दरम्यान, पुणे ग्रामीण वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लोणीकंद पोलिसांच्या मदतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड यांनीही या दरम्यान पाहणी केली.

प्रसंगावधानामुळे वाचला मोटारचालकाचा जीव
वाहतूक कोंडी झालेली असतानादेखील सहा ते सात कंटेनर वाघेश्वर मंदिर चौकाच्या अलीकडील रस्त्यालगत उभे करण्यात आले होते. त्यातील एक कंटेनर चालकाविना काही अंतर पुढे गेला आणि त्याची कारला ठोकर बसली. मात्र यातून कारचालक सुखरूप बचावला. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी या कंटेनरवर कारवाई केली.

वाघेश्वर मंदिर चौकाच्या परिसरात अनेक गोदामे आहेत. येथील एका शोरूमच्या कार घेऊन हे कंटेनर आले होते. ते या शोरूमसमोर नगरच्या दिशेने रस्त्यावर उभे होते. उपसरपंच संदीप सातव यांनी ते तेथून हलविले. त्यानंतर चालकांनी ते पुन्हा महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने उभे केले. त्या ठिकाणी उतार आहे. या वेळी सौरभ सातव हे कार घेऊन जात होते. त्यांना मोबाईलवर कॉल आल्याने ते कार बाजूला घेऊन बोलत होते. 
त्या वेळी चालकाविनाच कंटेनर पुढे जाऊ लागला. तेथे असणाऱ्या नागरिकांनी आरडा ओरड केल्यानंतर सौरभ यांनी तत्परतेने कार पुढे घेतली, नाही तर मोठा अपघात झाला असता. कंटेनरची ठोकर बसल्याने कारचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर कंटेनरचालक पळून गेला. संतप्त नागरिकांनी चौकातील सर्व कंटेनरच्या टायरमधील हवा सोडून दिली. त्यानंतर पोलिसांनी कंटेनरचालकांवर कारवाई केली.

तरीही रस्त्यावरच...
हे कंटेनर थांबण्यासाठी जागेची व्यवस्था असतानाही कंटेनरचालक रस्त्यालगत कंटेनर उभे करतात. याबाबत ग्रामपंचायत व पोलिसांनी अनेक वेळा नोटीस बजावल्या आहेत. मात्र हे चित्र अद्याप 
बदलले नाही.

Web Title: Traffic issue Road work wagholi