अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

पिंपरी - खाद्यपदार्थ विक्रेते, फेरीवाले, पथारीवाले आणि दुकानदारांनी थेरगाव येथील डांगे चौकाच्या चारही दिशांकडील रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. बेशिस्त आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांमुळे चौकाचा ‘श्‍वास’ पुरता गुदमरून गेला आहे. ‘नाही कोणी वाली... न कोणी पुसतो... ख्याली-खुशाली’ अशी चौकाची अवस्था झाली आहे, त्यामुळे भव्य उड्डाण पूल, प्रशस्त चौक आणि रुंद रस्ते असूनही तेथील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागल्याचे दिसून येत नाही.  

शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने शहरातील अतिशय महत्त्वाच्या चौकांमध्ये थेरगाव येथील डांगे चौकाची गणना होते. या चौकामधून हिंजवडी-चिंचवडगाव, औंध-रावेत हा परिसर जोडला जातो. या चौकाजवळूनच बेंगलोर-पुणे महामार्गही जातो, त्यामुळे या चौकात नेहमी रहदारी असते. वाढती रहदारी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने, डांगे चौकात भव्य उड्डाण पूल बांधला. त्या पुलावरून औंध-रावेत अशी दुहेरी वाहतूक चालू असते. डांगे चौकाचे सुशोभीकरण करून तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे; परंतु प्रत्यक्षात डांगे चौक निरनिराळ्या समस्यांनी ग्रासला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज मार्केट आहे. तेथील मासळी बाजार रस्त्यावरच भरतो. याच चौकात दर रविवारी आठवडे बाजार भरतो, तेव्हा चौक आणि त्याचे रस्त्यांवरील वाहतुकीची क्षमता अगदी निम्म्यावर येऊन ठेपते. चौकाच्या चाही बाजूंनी जवळपास अर्ध्या किलोमीटरपर्यंतचा परिसर निरनिराळ्या अतिक्रमणांनी व्यापून जातो. सर्व मिळून सुमारे तीन हजारांहून अधिक पथारी, हातगाडी विक्रेत्यांनी चौकाचा पूर्णपणे ताबाच घेतला आहे. उड्डाण पुलाखालून रावेतकडे जाणारा रस्ताच रविवारच्या दिवशी जवळपास अघोषितरीत्या बंद झालेला असतो.  

भर चौकातच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत असल्याने सिग्नल चालू असो वा बंद वाहतुकीला अडथळा होत असतो. काही नागरिक दुचाकी-चारचाकी गाड्यांमध्ये येऊन चौकातच गाडी उभी करून भाजीपाला खरेदी करत असतात. एका बाजूला भाजीपाला विक्रेते तर दुसऱ्या बाजूला फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू विक्रेत्या दुकानदारांनी स्वतःच्या दुकाना समोरील पदपथ पूर्णपणे गिळंकृत केला आहे. 

चौकालगत ‘पीएमपी’चे बसथांबे आहेत. त्यासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक उभे असतात, त्यामुळे बसचालकाला प्रवाशांना उतरविण्यासाठी रस्त्याच्या मधोमध बस उभी करावी लागते. चौकातील, सर्जा लॉज समोरील पदपथ खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पूर्णपणे बंद करून टाकत आहे. याच लॉजच्या मागील बाजूच्या मोकळ्या जागेतही मोठा बाजार भरतो, त्यामुळे नागरिकांची तेथेही वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते.

Web Title: Traffic jam due to Encroachment