पुण्यात खड्ड्यांमुळेच कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेला वाहतूक पोलिसांनीच खड्डे असल्याची जाणीव करून दिली आहे.

पुणे - शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेला वाहतूक पोलिसांनीच खड्डे असल्याची जाणीव करून दिली आहे. ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत, तेथेच वाहतुकीची कोंडी होते, त्याविषयीची सविस्तर यादी वाहतूक विभागाने महापालिकेच्या पथविभागाकडे पाठविली आहे. वाहतूक पोलिसांच्या या पवित्र्यामुळे आता तरी महापालिका खड्डे बुजविण्याची बाब गांभीर्याने घेणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दोन आठवड्यांपासून शहरातील संततधार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची अक्षरश- चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे शहरातील वाहतूक कासवगतीने सुरू आहे. परंतु महापालिका खड्डे बुजविण्यासाठी ठोस प्रयत्न करत नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या वाहतूक विभागाने सर्व विभागांकडून त्यांच्या हद्दीतील खड्डे असलेल्या रस्त्यांची यादी मागविली. ती महापालिकेला सादर करून खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचनाही पोलिसांनी पथ विभागाला दिल्या.

खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने सुरू राहण्याबरोबरच कोंडीही होते. त्यामुळे संबंधित रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशा सूचना महापालिकेला केल्या आहेत.
जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियोजन

विभाग         खड्डे असलेले रस्ते 
विश्रामबाग     - बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता व टिळक रस्ता
शिवाजीनगर     - संचेती रुग्णालय
चतु-शृंगी     - औंध रस्ता, विद्यापीठ चौक, विद्यापीठ उड्डाण पूल,             पाषाण शिवाजी सर्कल, स्पायसर, बाणेर रस्ता
हडपसर     - सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, सासवड रस्ता,             ससाणेनगर रस्ता
कोथरूड     - पौड रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, कर्वे रस्ता 
मुंढवा     - मगरपट्टा रस्ता, मुंढवा, जहाँगीरनगर
भारती विद्यापीठ     - पुणे सातारा रस्ता, त्रिमूर्ती चौक, दत्तनगर चौक,             कात्रज बाह्यवळण, राजस सोसायटी
बंडगार्डन     - सर्किट हाऊस, साधू वासवानी,आरटीओ, बोल्हाई,             विधानभवन, अलंकार,ब्लु नाईल, आयबी चौक
सहकारनगर     - शारदा आर्केड, महेश सोसायटी, चिंतामणीनगर,             पद्मावती पंपिंग स्टेशन
कोरेगाव पार्क     - बंडगार्डन रस्ता, नॉर्थ मेन रोड, ब्लू डायमंड-कोरेगाव             पार्क चौक, साधू वासवानी पूल
येरवडा     - पर्णकुटी, सादलबाबा, तारकेश्‍वर, गुंजन चौक, नगर             रोड कॉमर्स झोन, सिद्धेश्‍वर चौक, आंबेडकर चौक,             संगमवाडी व वडगाव शेरी चौक
वानवडी     - रामटेकडी, सोपाननगर, मम्हांदेवी, काळुबाई, सोलापूर 
        बाजार, सीटीसी हॉस्पिटल, घड्याळ चौक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam by pits in Pune