Pune Rain : पुणेकरांनो, या रस्त्याने जात असाल, तर पर्यायी मार्ग वापरा!

टीम ई-सकाळ
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

पुणे शहर आणि परिसरात हलक्या सरी कोसळत असून हा पाऊस 5 नोव्हेंबरपर्यंत शहरात मुक्कामाला राहण्याची शक्यता हवामान  विभागाने वर्तविली आहे.

पुणे : सायंकाळी सहा वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची भंबेरी उडाली आहे. फिरण्यासाठी तसेच खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक घरी परतत असताना पावसाला सुरवात झाल्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुणे स्टेशन, धनकवडी, कोथरूड, कर्वेनगर, वारजे-माळवाडी, बिबवेवाडी या भागांत जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे.

सध्या नगर रस्ता, डेक्कन कॉलेज रस्ता, बंडगार्डन रस्ता, कृषी महाविद्यालय रस्ता ते संचेती हॉस्पिटल, स्वारगेट ते हडपसर रस्ता या मार्गाने जर तुम्ही प्रवास करत असाल, तर तुम्ही पर्यायी रस्ताचा वापर करू शकता. कारण या मार्गांवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे गुगल मॅपवर दिसत आहे. 

तसेच आंबील ओढ्याला पुन्हा पूर आलेला असून ओढ्यालागतच्या गुरुराज सोसायटीमध्ये पुन्हा ओढ्याचे पाणी शिरले आहे. मागील महिन्यामध्ये 25 तारखेला झालेल्या पाऊसाची आठवण नागरिकांना झाली असून काळजाचा ठोका चुकलेले असल्याची भावना नागरिक वक्त करत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून वारंवार कोसळत असलेल्या पावसामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. त्यात पुणे शहर आणि परिसरात हलक्या सरी कोसळत असून हा पाऊस 5 नोव्हेंबरपर्यंत शहरात मुक्कामाला राहण्याची शक्यता हवामान  विभागाने वर्तविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam on these routs due to rain in Pune