...म्हणून होते राजगुरुनगरला वाहतूक कोंडी

राजेंद्र सांडभोर
बुधवार, 4 डिसेंबर 2019

राजगुरुनगर (ता. खेड) येथून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर आणि राजगुरुनगर भीमाशंकर राज्य मार्गावर म्हणजे वाडा रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीला अवैध वाहतूक करणारी वाहने आणि त्या वाहनचालकांचा बेशिस्तपणा कारणीभूत आहे. मात्र अर्थपूर्ण संबंधांमुळे पोलिसांकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

राजगुरुनगर (पुणे) : राजगुरुनगर (ता. खेड) येथून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर आणि राजगुरुनगर भीमाशंकर राज्य मार्गावर म्हणजे वाडा रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीला अवैध वाहतूक करणारी वाहने आणि त्या वाहनचालकांचा बेशिस्तपणा कारणीभूत आहे. मात्र अर्थपूर्ण संबंधांमुळे पोलिसांकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

महामार्गावर एसटी बस स्थानक परिसर, पाबळ चौक व मार्केट यार्ड परिसरात प्रामुख्याने वाहतूक कोंडी होते. या तीनही ठिकाणी महामार्गाच्या आजूबाजूला अवैध वाहतूक करणारी वाहने बेशिस्तपणे पार्किंग करून उभी असतात. रस्त्याच्या कडेवर आणि बऱ्याचदा रस्त्यावर एक बाजू चढवून ही वाहने प्रवासी भरत किंवा उतरवत असतात. त्याच वेळी रस्त्यावरून मोठी वाहने जाऊ लागल्याने वाहतूक मंद झाली की छोट्या वाहनांना त्यांना ओव्हरटेक करता येत नाही. त्यामुळे कोंडीला सुरुवात होते आणि असंख्य प्रवाशांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. पोलिसांकडून कारवाईचा फार्स केला जातो. कागदावर दाखवायला केसेस केल्या जातात. पण मूळ प्रश्‍न काही कोणी सोडवत नाही.

वाडा रस्त्यावरही, जुना मोटार स्टॅण्ड भागात ही अवैध वाहतूक करणारी वाहने सतत मच्छीमार्केटच्या मागे त्यांच्या तळाच्या दिशेने येत जात असतात. त्यामुळे हमखास कोंडी होते. तसेच महात्मा गांधी विद्यालयाच्या बाजूला असलेल्या टपऱ्या आणि त्यांच्याही बाजूला ही व्हावे उभी राहतात, त्यामुळे कोंडी होते.

थोडे दिवसच काही सुधारणा...
खेडचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी 2016 मध्ये याबाबत विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनाही वस्तुस्थिती मान्य करावी लागली होती. त्यानंतर सरकारी परिपत्रक काढून सूचना देण्यात आल्या होत्या. पुढे थोडे दिवस काही सुधारणा झाल्या. पण पुन्हा सर्व पूर्ववत झाले आहे.

सध्या एसटी आणि पीएमपी बसवर सर्व प्रवास अवलंबून आहे. प्रवासी संख्या मोठी असल्याने त्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यांची समांतर प्रवासी वाहतूक व्यवस्था निर्माण झाल्याने आणि तिला समर्थ पर्याय नाही. म्हणून पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे, अवैध वाहतुकीच्या वाहनांना वेगळा थांबा करणे, शिस्त पाळावयास लावणे, अशा उपाययोजना गरजेच्या आहेत.
- शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरुनगर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Problem On Pune-Nasik Highway