खडकी बोर्ड हद्दीतील वाहतूक कोंडी फुटणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

बोपोडी, ऑल सेंट चर्च, सर्वत्र विहार चौकात भुयारी मार्ग अन्‌ उड्डाण पूल; महापालिकेचा प्रस्ताव

बोपोडी, ऑल सेंट चर्च, सर्वत्र विहार चौकात भुयारी मार्ग अन्‌ उड्डाण पूल; महापालिकेचा प्रस्ताव
पुणे - बोपोडी, ऑल सेंट चर्च व सर्वत्र विहार या तिन्ही ठिकाणी भुयारी मार्ग व उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने खडकी कॅंटोन्मेंटकडे पाठविला आहे. त्यामुळे लवकरच खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई- पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास कमी होईल.

कॅंटोन्मेंटसह लष्कराच्या विविध विभागांची परवानगी मिळाल्यानंतर भुयारी मार्ग व उड्डाण पूल बांधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येणाऱ्या अंडी उबवणी केंद्र ते बोपोडी मार्गावर दररोज सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याच मार्गावर मेट्रो स्टेशन, बीआरटी प्रस्तावित आहे.

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार व कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या संदर्भातील माहिती जगताप यांनी सर्वसाधारण सभेत दिली. या वेळी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर धीरज मोहन, उपाध्यक्ष अभय सावंत, सदस्य सुरेश कांबळे, कमलेश चासकर, मनीष आनंद, पूजा आनंद, कार्तिकी हिवरकर, वैशाली पहिलवान व दुर्योधन भापकर उपस्थित होते.

या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेने कॅंटोन्मेंट बोर्डाकडे दिला असून, तो अद्ययावत करून लष्कराचा मालमत्ता विभाग, महासंचालक कार्यालय आणि संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. तेथून मंजुरी मिळवल्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल. त्यासाठी सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागण्याची शक्‍यता आहे.

जगताप म्हणाले...
- आंबेडकर रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बोपोडीत उड्डाण पूल
- खडकी पोलिस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस दोन भुयारी मार्ग
- त्यापुढील रस्त्याचे रुंदीकरण करून तो औंध रस्त्याला जोडण्यात येईल
- ऑल सेंट चर्च येथील चौकात दुहेरी उड्डाण पूल बांधण्याचा विचार
- अंडी उबवणी केंद्राजवळील सर्वत्र विहार समोरील चौकामध्येही दुहेरी पूल

केवळ दहा टक्के खासगी मालमत्ता
खडकीतून जाणाऱ्या मुंबई- पुणे महामार्गावर बनविण्यात येणाऱ्या उड्डाण पूल व भुयारी मार्गासाठी रस्ता रुंदीकरण करावे लागणार असून, त्याचा फटका या रस्त्यावरील जुनी घरे, दुकाने आणि चित्रपटगृह यांना बसेल. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्‍न मनीष आनंद यांनी उपस्थित केला. त्यावर या प्रकल्पात 90 टक्के जमीन लष्कराची, उर्वरित जमीन कॅंटोन्मेंटची जाणार आहे. फक्त दहा टक्के खासगी मालमत्ता जाणार असल्याचे ब्रिगेडिअर मोहन यांनी स्पष्ट केले.

बोपोडीत बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलामुळे खडकीतून पिंपरीकडे आणि पिंपरीतून खडकीकडे वाहनांना सहज येता येणार आहे. तसेच, अन्य ठिकाणच्या दुहेरी उड्डाण पुलामुळे कोंडी फुटण्यास मदत होईल.
- अमोल जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅंटोन्मेंट बोर्ड

Web Title: traffic problem solve in khadki board area