ट्रान्सक्रिप्ट प्रमाणपत्र आता जूनमध्येच

ब्रिजमोहन पाटील
शनिवार, 14 डिसेंबर 2019

समितीने केलेल्या शिफारशी 

  • परीक्षा अर्ज भरतानाच ‘ट्रान्सक्रिप्ट’साठी अर्ज करावा 
  • जून २०२० पासून ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र निकालपत्रासोबत द्यावे
  • बनावट प्रमाणपत्र तयार होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी
  • सर्व अभ्यासक्रमांसाठी ‘ट्रान्सक्रिप्ट’ देता येईल

पुणे - परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी जाताना पदवी अभ्यासक्रमाच्या गुणांचा सारांश असलेले ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र अनिवार्य असते. परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हे प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे परदेशात जाण्याचे स्वप्न भंगत होते. यामुळे अखेर जागे झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वच अभ्यासक्रमांच्या निकालपत्रासोबतच जून २०२० पासून ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परदेशात शिक्षणासाठी प्रवेश घेताना संस्थांकडून किंवा नोकरीसाठी गेल्यानंतर कंपन्यांकडून ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्राची मागणी केली जाते. त्यामुळे हे प्रमाणपत्र परदेशात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. पुणे विद्यापीठात दरवर्षी ‘ट्रान्सक्रिप्ट’साठी सुमारे १६ ते १७ हजार विद्यार्थी अर्ज करतात. यामध्ये अभियांत्रीकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्याने अर्ज केल्यानंतर परीक्षा मंडळाकडून १५ दिवसांत ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र मिळणे आवश्‍यक असते.

ही होती स्मीता पाटील यांची शेवटची इच्छा

परंतु यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने विद्यार्थ्यांची परदेशातील शिक्षणाची आणि नोकरीची संधी हुकत आहे. याबाबात विद्यापीठ वारंवार तक्रारी येत होत्या. तसेच, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडेही थेट तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य संजय चाकणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. 

या समितीने परीक्षा विभागाकडे दरवर्षी किती अर्ज येतात? प्रमाणपत्र  मिळण्यासाठी किती कालावधी लागतो? लवकर देण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? प्रमाणपत्र बनावट तयार करता येऊ नये म्हणून खबरदारी काय घ्यावी? याचा अभ्यास करून अंतिम अहवाल नुकताच व्यवस्थापन परिषदेला सादर केला आहे. त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. 

तुमचा पर-डे इंटरनेट डेटा रात्रीत संपतो? 'हे' आहेत एकदम स्वस्त प्लान

‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना लवकर मिळावे यासाठी समितीन नेमण्यात आली होती. परीक्षेचा अर्ज भरताना प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जून महिन्यापासून निकालाच्या दिवशीच प्रमाणपत्र देण्याची शिफारस समितीने केली होती.
- संजय चाकणे, सदस्य, व्यवस्थापन परिषद, पुणे विद्यापीठ 

निकालाच्या दिवशीच ‘ट्रान्सक्रिप्ट’ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला आहे. जून महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल.
- डॉ. अरविंद शाळिग्राम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुणे विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transcript certificate now in June