झाडे तोडण्यात पारदर्शकता का नाही ? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

पुणे - शहरातील विकासकामांना विरोध नाही; मात्र झाडे तोडताना महापालिकेने पारदर्शकता का बाळगली नाही, मध्यरात्री झाडे तोडायची गरज होती का, असा सवाल करत याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महापालिका प्रशासनाविरुद्ध तक्रार करणार असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी रविवारी येथे सांगितले. तर, महापौर मुक्ता टिळक यांनी या रस्त्यावरील 36 झाडे तोडणे आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते औंध दरम्यानची काही झाडे महापालिकेच्या उद्यान विभागाने तोडली आहेत. ही वृक्षतोड बेकायदा आहे, असे काही वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे; तर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच झाडे तोडली आहेत, नियमाप्रमाणे वृक्षलागवड करण्याची प्रक्रियाही सुरू आहे, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. याबाबत शिरोळे म्हणाले, ""शहरातील विकासाला विरोध नाही. परंतु, मध्यरात्री अचानक झाडे का तोडली जातात? परिसरातील पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि रहिवाशांना विश्‍वासात न घेता प्रशासन निर्णय लादत आहे, त्याला विरोध आहे. तसेच, परिसरातील झाडे वाचली पाहिजेत. यापूर्वी तोडलेल्या वृक्षांच्या मोबदल्यात किती झाडे लावली, याचाही खुलासा महापालिका करीत नाही, त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत आहे.'' 

दरम्यान, याबाबत महापौर टिळक म्हणाल्या, ""या रस्त्यावरील 106 झाडे तोडण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. अधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थांबरोबर पाहणी करून 70 झाडे वाचविली आहेत. मात्र, उर्वरित 36 झाडे तोडणे आवश्‍यक आहे. त्याबदल्यात या रस्त्यावर दोन्ही बाजूला वृक्षलागवड करण्यात येईल.'' 

Web Title: Transparency of trees not cut