वाहतुकीची माहिती वेबपेजवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

पालखी काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतची माहिती वाहनचालकांना देण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने वेबपेज तयार केले आहे. त्यावर पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील कोणते रस्ते वाहतुकीस खुले किंवा बंद राहतील, याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

पुणे - पालखी काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतची माहिती वाहनचालकांना देण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने वेबपेज तयार केले आहे. त्यावर पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील कोणते रस्ते वाहतुकीस खुले किंवा बंद राहतील, याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शहरात बुधवारी (ता. २६) आगमन होणार आहे. हे पालखी सोहळे पुण्यात मुक्कामी असेपर्यंत शहरात परिसरातील विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी  https://changebhai.in/palkhi२०१९/ या वेबपेजची निर्मिती केली आहे. पालख्यांचे आगमन झाल्यानंतर हे वेबपेज कार्यान्वित होणार असल्याचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी पोलीस निरीक्षक अरविंद कळसकर उपस्थित होते.

शहरात पालख्या मुक्कामी असेपर्यंत वाहतुकीत मोठे बदल केले जातील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीतील बदलाबाबत प्रवाशांना सूचना देण्याचे आवाहन विमान कंपन्या, रेल्वे आणि एसटी प्रशासनाला करण्यात आले आहे. 

वेबपेजवर काय असेल 
पालखीचे आगमन झाल्यानंतर शहरातील वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते, वाहनचालकांना वापरता येणारे रस्ते, पालखीचा मार्ग, प्रमुख चौकात पोचण्यास लागणारा अपेक्षित वेळ, विसाव्याचे ठिकाण याबाबत या वेबपेजवर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मध्यवर्ती भागातील रस्त्याचा वापर टाळावा
मुंबई, नगर, सोलापूर मार्गाने शहरात येणाऱ्या वाहनचालकांसाठी वर्तुळाकार वाहतूक योजना सुरू केली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांनी शक्‍यतो पुढील चार दिवस मध्यभागातील रस्त्यांचा वापर करणे टाळावा. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transport Information on webpage Palkhi Sohala Traffic