वाहतूक समस्येने आयटी कंपन्यांचा तोटा वाढणार

सुधीर साबळे
सोमवार, 14 मे 2018

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये ये-जा करण्यासाठी असणाऱ्या रस्त्यांची पावसाळ्यात दाणादाण उडते. यंदादेखील हीच परिस्थिती कायम राहिल्यास वाहतूक समस्येमुळे आयटी कंपन्यांना सहन कराव्या लागणाऱ्या तोट्यात २० टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये ये-जा करण्यासाठी असणाऱ्या रस्त्यांची पावसाळ्यात दाणादाण उडते. यंदादेखील हीच परिस्थिती कायम राहिल्यास वाहतूक समस्येमुळे आयटी कंपन्यांना सहन कराव्या लागणाऱ्या तोट्यात २० टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने एक सर्वेक्षण केले होते. नित्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आयटी कंपन्यांना प्रत्येक दिवसाला २५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. कोंडीमुळे आयटी कर्मचाऱ्यांना किमान ९० मिनिटे इथल्या वाहतुकीमध्ये अडकून पडावे लागत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. आयटी पार्कमध्ये दीड लाख आयटी कर्मचारी काम करतात, त्यामुळे कंपन्यांना होणाऱ्या तोट्याचा आकडा दर महिन्याला ५०० कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोचतो. 

रस्त्याची स्थिती कशी आहे?  
हिंजवडी आयटी पार्कमध्ये ये-जा करण्यासाठी वाकड, भूमकर चौक या दोन मुख्य रस्त्यांच्या व्यतिरिक्‍त चांदे-नांदे रोड, माण गावातला रस्ता उपलब्ध आहे. गेल्यावर्षी चांदे-नांदे भागातून येणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साठले होते, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करून तेथे संरक्षक भिंत बांधण्याची सूचना एमआयडीसीला केली आहे. परंतु, यासाठी निधी न मिळाल्याने पावसाळ्यानंतरच हे काम मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. 

माण गावातून आयटी पार्ककडे येणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्यात येत आहे. त्याचे ९० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पावसाळ्याअगोदर न झाल्यास आयटी कर्मचाऱ्यांना त्रास होईल. आयटी पार्कमध्ये येणाऱ्या वाकड रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. भूमकर चौकातून आयटी पार्कमध्ये येणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम रखडले आहे. या संदर्भात महापालिकेबरोबर असोसिएशनचा पत्रव्यवहार सुरू आहे.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये येण्यासाठी वाकड आणि भूमकर चौक या व्यतिरिक्‍त असणारे पर्यायी रस्ते अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे या रस्त्यावरील ताण कमी होणार आहे. याठिकाणच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची आवश्‍यकता आहे. 
- कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन 

आयटी पार्कमध्ये ये-जा करण्यासाठी किमान चार ते सहापदरी पर्यायी दोन ते तीन रस्ते असायला हवेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयटी कंपन्या इथे असताना किमान रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा बळकट करण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.
- संदीप राऊत, संगणक अभियंता

Web Title: Transport Issue IT Company Loos