शिवप्रेमींची किल्ल्यांवर स्वच्छतेची लढाई 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

"द ट्रेश टॉक' संस्थेच्या शिवप्रेमींनी स्वच्छतेसाठी लढाई सुरू केली असून, तीन वर्षांत 25 किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवून शिवाजी महाराजांना एकप्रकारे अभिवादनच केले आहे. 

"द ट्रेश टॉक' संस्थेचा उपक्रम; तीन वर्षांमध्ये 25 किल्ल्यांवर स्वच्छता 

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्येक किल्ला म्हणजे पराक्रम, शौर्य, शिस्तीचा इतिहास सांगणारा. पण, पर्यटकांमुळे किल्ल्यांवर अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होत आहे. या ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य राखले जावे, यासाठी "द ट्रेश टॉक' संस्थेच्या शिवप्रेमींनी स्वच्छतेसाठी लढाई सुरू केली असून, तीन वर्षांत 25 किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवून शिवाजी महाराजांना एकप्रकारे अभिवादनच केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"द ट्रेश टॉक'चे प्रमुख केदार पाटणकर हे सहकाऱ्यांसोबत दुर्गभ्रमंतीसाठी जातात. तेथे प्लॅस्टिक बाटल्या, कागद यासह इतर कचरा बघून मन व्यथित होत असे. त्यामुळे त्यांनी किल्ले स्वच्छ करण्याचा संकल्प केला. तोरणा किल्ल्यावरून मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये वृषाली पाटणकर, रवी कान्हेरे, मीता कान्हेरे, किरण यज्ञोपवीत, हर्षद वेलणकर, सुनील जोशी, मुग्धा जोशी, प्रसन्न भारद्वाज, प्राजक्ता भारद्वाज, आशीष सप्रे, मकरंद घोलबा, रोहन पाटणकर, सोनिया कान्हेरे, सिद्धार्थ जोशी, सोनाली फडणीस यांनी भाग घेतला. यातील कोणी डॉक्‍टर, तर कोणी इंजिनिअर; तर काही जण अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. पण, महिन्यातील एक दिवस एका किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी द्यायचा, याचा निश्‍चय केला आहे. आतापर्यंत राजगड, विजयदुर्ग, पुरंदर, रोहिडा, प्रतापगड, लोहगड, तिकोना, रायरेश्‍वर, राजगड, सिंहगडावर स्वच्छता केली. यामध्ये काही किल्ल्यांवर दोन वेळा कचरा संकलित केला आहे. 

केदार पाटणकर म्हणाले, ""किल्ले स्वच्छ नाहीत, म्हणून आपण व्यवस्थेला दोष देतो. त्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आम्ही कचरा संकलित करत असल्याचे बघून किल्ल्यांवर इतर फिरायला येणारे लोकही मोहिमेत सहभागी झाले. एकावेळी किमान 20 किलो कचरा निघतो. तो रुद्र फाउंडेशन संस्थेला दिला जातो. ते यापासून इंधन तयार करतात.'' 

पुन्हा तेवढाच कचरा निघतो 
राजगड, पुरंदर, सिंहगड, तोरणा यासह काही किल्ल्यांवर दोन वेळा स्वच्छता केली. पुन्हा काही महिन्यांनी तेथे गेलो तेव्हा पुन्हा कचरा पडल्याचे दिसून आले. लोकांची मानसिकता बदलत नसल्याने दुःख होते. तरीही सोशल मीडियावर छायाचित्रे टाकून जनजागृतीचा प्रयत्न सुरू आहे, असे पाटणकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Trash Talk organization Cleanliness on fort